नागपूर : बंगळुरूवरून दिल्लीला जाणारे सात कोटी रुपयांचे तब्बल ६८५ नवे कोरे लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळीला गुजरातमधील सुरतमधून अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरट्यांनी मूळ कंटेनरमधून माल उतरवून दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून गुजरातकडे पळ काढला होता. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून एखाद्या ‘वेबसिरीज’च्या कथानकाप्रमाणेच पोलिसांनी आरोपींचा शोध लावत त्यांना अटक केली. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील व उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली.
बंगळुरूतील एका कंपनीतून ६८५ लॅपटॉप लॉजिस्टिक एक्स्प्रेस नावाच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरमधून दिल्लीकडे जात होते. २६ मे रोजी काही गारमेंट्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक सामान असा ७.४३ लाखांचा माल लोड करून कंटेनरमधून दिल्लीकडे रवाना करण्यात आला होता. हरीश हाजर खान (२७, मेवाड, हरयाणा) हा चालक होता तर त्याच्यासोबत मोहम्मद मुस्तफा धन्ना खान (२४, पालवल, हरयाणा) हा क्लिनर होता. २९ मे रोजी कंटेनर नागपुरात पोहोचला. मात्र रात्री दोन वाजेपासून ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत त्याचे जीपीएस लोकेशन पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दाखवत होते. ड्रायव्हर फोन उचलत नव्हता. त्यामुळे नेमका काय प्रकार झाला हे पाहण्यासाठी कंपनीचे मालक अमरनाथ गोविंद संग्राम हे बंगळुरूवरून नागपूरला आले. संबंधित कंटेनर हा रिकामा होता व दोघांचेही फोन बंद होते. अखेर त्यांनी पारडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली व गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल इंगोले व सायबर युनिटच्या बलराम झाडोकार यांचे पथक तयार करण्यात आले. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आरोपी हे गुजरातमधील सूरतजवळील बारडोली येथे गेल्याची बाब समोर आली.
दुसऱ्या कंटेनरमध्ये माल ‘ट्रान्सफर’
हरीश हाजर खान व मोहम्मद मुस्तफा धन्ना खान यांनी पारडीत दुसऱ्या एका कंटेनरमध्ये माल ट्रान्सफर केला. तो कंटेनर शाहिद सफी मोहम्मद खान (२४, धरमपेठ, गुजरात) व आसिफ मसूद खान (२७, नुहू, हरयाणा) हे गुजरातहून घेऊन आले होते. या दोघांनादेखील अटक करण्यात आली आहे.
सुरतमध्ये अगोदरपासूनच होते पथक
दरम्यान, कळमना येथील ट्रक चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकचे पोलिस उपनिरीक्षक दीपक ठाकरे हे पथकासह सुरतमध्येच होते. सुदर्शन यांनी लगेच आरोपींची माहिती देत त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले. ठाकरे यांच्या पथकाने बारडोली येथील पोलिसांच्या मदतीने तेथे जाऊन चारही आरोपींना अटक केली. दीपक रिठे, विलास कोकाटे, संतोश गुप्ता, पंकज हेडाऊ, कपिल तांडेकर, राहुल कुसरामे, बबन राऊत, सुशांत सोळंकी, सोनू भवरे, रितेश तुमडाम, चंद्रशेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर, पुरुषोत्तम नाईक, मिथुन नाईक, पराग ढोक यांच्या पथकाने विविध मार्गाने तपास केला.
४५ लाखांचा माल विकला
या आंतरराज्यीय टोळीचे गुजरातमध्ये इतरदेखील सदस्य होते. या टोळीतील सदस्यांनी ४५ लाखांचे लॅपटॉप व टीव्ही मॉनिटर्स इतक्या कमी कालावधीत विकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींकडून ट्रकसह ९ कोटी ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीकडून याअगोदरदेखील असे गुन्हे केल्याची शंका असून चौकशीतून ही बाब समोर येण्याची शक्यता आहे.