सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिह्यात अँटीबॉडीज तपासणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला जुलै महिन्यात सुरुवात झाली. परंतु किटच्या समस्यांमुळे ही चाचणीच ठप्प पडली. परंतु आता पुन्हा हे सर्वेक्षण होणार आहे. यावेळी ४००० लोकांची तपासणी करून निष्कर्ष काढला जाणार आहे.ज्यांना लक्षणे नाहीत परंतु कोविड होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोविड अँटीबॉडीज वाढले असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘क्लिनिकल इन्फेक्शन’ म्हणतात. अशा संसर्गाचे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी जिल्ह्यातील २४०० लोकांची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली होती. यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुके व महानगरपालिकेच्या १० झोनचा समावेश करण्यात आला होता.
मनपा झोन व तालुक्यामधील सामान्य वसाहतीतील १४०० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या. कन्टेन्मेंट झोनमधील ६०० तर हायरिक्स ग्रुपमधून ४०० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या. पहिल्या टप्प्यात कोविड रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, मनपा कर्मचारी, पोलीस व पत्रकारांच्या रक्ताचे नमुनेही गोळा करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या सहकार्याने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (मेडिकल) पीएसएम विभागाच्या मदतीने हे सर्वेक्षण सुरू होते. परंतु साधारण ७०० चाचण्यांनंतर अचानक सर्वेक्षण बंद पडले. किटच्या तुटवड्यामुळे ते बंद झाल्याचे सांगण्यात येते.
-महिनाभरात निष्कर्षमेडिकलच्या पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, सिरो सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. ४००० लोकांचे सर्वेक्षण करण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. साधारण पुढील आठवड्यापासून याला सुरुवात होईल. परंतु यात हायरिक्स व लोरिक्स लोकांचा असा ग्रुप नसणार. मनपाच्या दहाही झोनमधील व तालुक्यातील निवडक लोकांच्या तपासण्या त्यावरून निष्कर्ष काढला जाईल. याला साधारण एका महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.-डॉ. उदय नारलावारप्रमुख, पीएसएम विभाग, मेडिकल