स्नेहलता श्रीवास्तव
नागपूर : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) ने वैद्यकीय उपकरणे किंवा शरीराचे कृत्रिम अवयव निर्मितीच्या क्षेत्रात स्टार्ट-अप किंवा उद्याेग सुरू करण्याची इच्छा असलेल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नवी संधी उपलब्ध केली आहे. संस्थेने बायाेमेडिकल इंजिनिअरिंगची संकल्पना असलेला ‘इंजिनिअरिंग अप्लाईड टू मेडिकल सायन्स’ (ईएएमएस) हा एम-टेक. काेर्स सुरू केला आहे. देशातील कोणत्याही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मध्य भारतातील इतर कोणत्याही संस्थांमध्ये सुरू केलेला हा एकमेव अभ्यासक्रम आहे.
अभियांत्रिकीच्या केमिकल, मेकॅनिकल, मेटालर्जिकल, मटेरियल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्राॅनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमाला एमबीबीएस आणि दंत चिकित्सा पदवीधरांनाही प्रवेश घेता येईल अशाप्रकारे अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याची याेजना असल्याची माहिती व्हीएनआयटीचे संचालक प्रा. व्ही. एम. पडाेळे यांनी दिली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी उद्याेजक म्हणून एकदम नव्या क्षेत्रात पाऊल टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला आहे. या दिशेने हा एक आदर्श प्रयत्न आहे. यावर्षी काेराेना असूनही १४ पैकी ६ जागा भरू शकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता हे केवळ अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारकांपुरतेच मर्यादित आहे, परंतु आम्ही लवकरच वैद्यकीय डॉक्टरांसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चार सेमिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ सराव तसेच डाॅक्टरांची नियुक्ती केली आहे. यासाठी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर या संस्थांशी करार केला आहे. पेडिट्रिशियन डाॅ. सतीश देवपुजारी, डाॅ. निरंजना गाेपाल, डाॅ. मिलिंद भातखुले, डाॅ. चैताली चिंदलाेरे व डाॅ. पंकज ढुले हे यातील प्रमुख शिक्षक आहेत.
ईएएमएसच्या अभ्यासक्रम समन्वयक व सहायक प्रा. रश्मी उद्दनवाडीकर यांनी सांगितले, या अभ्यासक्रमात बीई. किंवा बी-टेक.चे विद्यार्थी फिजिओलाॅजी, ॲनाटाॅमी, बायाेकेमिस्ट्री, माेलिक्यूलर बायाेलाॅजी, मटेरिअल फाॅर बायाेमेडिकल अप्लिकेशन, बायाे इन्फाॅरमॅटिक्स, प्राेडक्ट डिझाईन ॲन्ड डेव्हलपमेंट आदी विषय शिकविले जाणार आहेत. द्वितीय वर्षात प्रकल्प कामाच्या प्रशिक्षणासाठी असेल.