राजेश शेगाेकार
नागपूर : ‘घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’ अशी एक म्हण आपल्याकडे चांगलीच लाेकप्रिय आहे. आधीच घरात अनेक जनावरे आहेत, त्यांचीच व्यवस्था नीट हाेत नाही त्यात व्याह्यांकडून थेट घाेडेच सांभाळण्यासाठी पाठविल्यावर नाही म्हणता येत नाही अन् त्यांना सांभाळताना नवीनच संकट उभे राहते, अशी विचित्र स्थिती निर्माण हाेते. नेमका असाच अनुभव गडचिराेली, गाेंदिया या दाेन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत आहे. या भागात सरकार नावाच्या व्याह्याकडून घाेड्यांऐवजी थेट हत्तीच पाठविल्याने नव्या संकटाची भर पडली आहे.
आधीच मानव अन् वन्यजीव संघर्ष हाेताच त्यामध्ये आता रानटी हत्तींचा उच्छाद वाढला आहे. हत्तीच्या पायाने लक्ष्मी येते, असा समज खाेडून निघत हत्तीच्या पायांनी लक्ष्मी देणारे लाखमाेलाचे पीक मातीमाेल हाेतानाच दु:ख पचवावे लागत आहे.
छत्तीसगडच्या जंगलातून ऑक्टोबर २०२१ मध्ये २३ हत्तींचा कळप आता व्याघ्रभूमी असलेल्या विदर्भात दाखल झाला. दरम्यान, १७ एप्रिल २०२२ ला राज्याची सीमा साेडली हाेती; पण हा कळप ऑगस्ट २०२२ मध्ये पुन्हा परतल्यानंतर त्यांनी थेट गडचिराेलीच्या वडसा विभागातील मलेवाडा परिसरात प्रवेश केला. त्यानंतर दाेनदा गाेंदिया जिल्ह्यात गेला, भंडारा जिल्ह्यातही भ्रमंती केली हाेती.
हत्तींचे हे वैभव विदर्भाच्या वनवैभवात भर घालत आहे यात कुणाचे दुमत नाही. किंबहुना आपल्या विदर्भालाही हत्तींच्या अधिवासाचा इतिहास हाेता त्याचे आता पुनर्जीवन हाेत असल्याचाही आनंद आहे. एक टस्कर, सहा बछडे व प्राैढावस्थेतील हत्ती असे एकूण २३ हत्ती गेल्या वर्षभरात गडचिराेली, गाेंदिया आणि भंडारा जिल्ह्यात भ्रमंती करीत आहेत. महाराष्ट्र वन विभाग आणि पश्चिम बंगालच्या स्ट्राइप्स ॲण्ड ग्रीन अर्थ फाउंडेशन (सेग) या एनजीओद्वारे या जंगली हत्तींवर लक्ष ठेवले जात आहे. ही सगळी चांगली बाजू असली तरी मानव वन्यजीवांच्या संघर्षातील या नव्या भिडूचा वाढता त्रासही नजरेआड करता येणार नाही.
गडचिराेली जिल्ह्यातील कुरखेडा, चारभट्टी, दादापूर, आंधळी (नवरगाव), आंबेझरी, रामगड, शिरपूर, गुरनाेली, अरतताेंडी, चिनेगाव, पळसगाव, साेनसरी, चांदागड, उराडी, चरवीदंड, आंधळी (साेनपूर), चांदाेना, उराडी, वासी, आरमाेरी तालुक्यातील माेहझरी, सुकाळा, काेरची तालुक्यातील लेकुरबाेडी, चरवीदंड (मयालघाट), मयालघाट, झनकारगाेंदी, बेडगाव घाट, माेठा झेलिया धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव परिसराला हत्तीच्या संकटाने घेरले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी, राजोली, भरनोली, नवेगावबांध, उमरपायली, नागणडोह, पालांदूर, जमी, धाबे पवनी, इटियाडोह, बोळदे, कवठा, बोंडगावदेवी, येरंडी दर्रे, तिडका, कवठा डोंगरगाव, रामपुरी या परिसरात या हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला होता.
भंडारामधील साकाेली लाखांदूर तालुक्यातील शिवारातही, तर चंद्रपुरातील सावली तालुक्यात हत्तीची भ्रमंती झाली आहे. त्यामुळे या परिसरावरही संकटाचे सावट आहेच.
मानव वन्यजीव संघर्ष
बिबटे, वाघ, अस्वलाच्या हल्यात मनुष्यहानी अन् जनावरांचे हाेणारे मृत्यू, काळवीट, नीलगायी, रानडुक्कर यामुळे हाेणारे पिकांचे नुकसान यामधून मानव व वन्यप्राणी यांच्यामध्ये संघर्ष उभा ठाकला. गेल्या पाच ते दहा वर्षांत अशी २ लाख २३ हजार प्रकरणे समाेर आली आहेत, त्यामध्ये १ लाख ३० हजार हेक्टरवर पीक नुकसानीचे दावे आहेत. या संघर्षामध्ये मग मानवानेही शिकारी, विषबाधा, विजेचा शाॅक असे प्रकार वापरून वन्यप्राण्यांच्या हत्या केल्या. त्यामध्ये राज्यात पाच वर्षांत ११५ वाघांचा मृत्यू झाला, या संघर्षात हत्तींचे नवे संकट उभे ठाकले आहे.
हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला
गोंदिया जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने २ ऑगस्ट रोजी पहाटे आंबेझरी (ता. कुरखेडा) येथे १४ घरे जमीनदोस्त केली. १८ ते २० हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मुलाबाळांसह जिवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव करावी लागली.
असे केले नुकसान
(१ जानेवारी ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत)
गडचिराेली जिल्हा १८५ प्रकरणे
नुकसानभरपाई २९ लाख
गाेंदिया जिल्हा १०५ प्रकरणे
नुकसानभरपाई २५ लाख
मानव-हत्ती संघर्षाच्या व्यवस्थापनाची गरज
उन्हाळ्यातही मुबलक चारा आणि पाणी मिळाल्याने हा त्यांच्यासाठी विदर्भाची भूमी हा हत्तींसाठी आदर्श अधिवास ठरत आहे. भविष्यात छत्तीसगडमधून आणखी काही हत्ती या भागात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात मानव-हत्ती संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी येत्या काही वर्षांत दीर्घकालीन उपाययाेजना शाेधाव्या लागतील.