गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘चूल आणि मूल’ या बंदिस्त अवस्थेतील महिलांसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली. म्हणूनच आज सर्वच क्षेत्रात महिला नावलौकिक मिळवित आहेत. महिलांची ही आगेकुच सुरू असली तरी, दुसरीकडे मुलींच्या आरोग्याकडे कुटुंब व समाज दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेत ‘नई दिशा प्रकल्प’ संस्थेने पुढाकार घेत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळात दहावी ते बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही, हे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळातून प्रामुख्याने स्लम भागातील वा गरीब कुटुंबातील मुली शिक्षण घेतात. आर्थिक विवंचनेमुळे त्या ‘सॅनेटरी पॅड’ वापरत नाहीत आणि या कालावधीत मुली शाळेत गैरहजर असतात. याचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्याच अनुषंगाने ‘नई दिशा प्रकल्प’ संस्थेच्या समन्वयक नसरीन अन्सारी यांनी नागपूर महापालिकेच्या शाळातील तीन हजाराहून अधिक मुलींना ‘सॅनेटरी नॅपकीन’ उपलब्ध करण्याचा संकल्प केला. एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात ही सुविधा उपलब्ध होऊ शकली असती. पण ही सुविधा कायमस्वरुपी सुरू राहील याची शाश्वती नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून मुलींना सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करण्याच्या त्यांनी प्रयत्न केला. यात त्यांना यश मिळाले. अर्थातच यासाठी आयुक्त अभिजित बांगर व अपर आयुक्त राम जोशी यांचा सकारात्मक प्रतिसादही महत्त्वाचा ठरला.‘नई दिशा’ प्रकल्पाला १९८४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात सुरूवात झाली. महिलांना सक्षम बनविण्यासोबत आदिवासी भागातील कुपोषित बालके, गरोदर माता व नवजात बालकांसाठी उपक्रम हाती घेतले. पुढे चंद्रपूर, नगर, नाशिक, जबलपूर यासह अन्य जिल्ह्यात संस्थेने कामाला सुरुवात केली तर नागपुरात २००७ मध्ये सुरूवात झाली. शहरातील दीड लाखाहून अधिक महिलांशी संवाद साधला. स्लम भागातील तसेच गरीब महिलांशी संपर्क साधला. त्यांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून तसेच त्यांचे छोटे गट स्थापन करून त्याचा महासंघ निर्माण करण्यात आला. महिलांनी केलेल्या बचतीतून गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी एक टक्के व्याजाने अर्थ साहाय्य केले जाते. अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण, गरोदर माता, कुपोषित बालके व विद्याथिंनी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. हा उपक्रम विदर्भातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा नसरीन अन्सारी यांचा मानस आहे.
समाज कल्याण विभागही सरसावला: बाजारात ‘सॅनेटरी नॅपकीन’ची किंमत ५ ते २० रुपयापर्यंत आहे तर ‘जेनेरीक सॅनेटरी नॅपकीन’ एक रुपयात उपलब्ध होत असून हा खर्च महापालिका करणार आहे. सोबतच शाळातील शौचालयाच्या ठिकाणी डिस्पोज व्यवस्था करण्यासाठी नसरीन अन्सारी यांना समाज कल्याण विभागानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याच अनुषंगाने, डिस्पोजची जबाबदारी शिक्षिका व मुलींकडे सोपवण्यात आली आहे.८०० विद्यार्थिनींचा सर्वे‘नई दिशा’च्या माध्यमातून महापालिक ा शाळातील ८०० विद्यार्थिनीचा सर्वे करण्यात आला. यात मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज, अनास्था व समस्या निदर्शनास आल्या. मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थिनी यांच्यात समन्वय साधून जनजागृती करण्यात आली. बहुसंख्य मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे ‘सॅनेटरी पॅड’ वापरणे शक्य नसल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले. यातूनच ‘सॅनेटरी पॅड’चा मोफत पुरवठा करण्याचा संकल्प केल्याची माहिती नसरीन अन्सारी यांनी दिली.