लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत सकारात्मक व आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर गुरुवारी मंथन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सेंटर पॉईंट कॉलेज येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे या होत्या. तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर हे वक्ता म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या शिक्षण प्रणालीसंदर्भात अनेक चुका झाल्या. आपल्या प्रणालीत दर्जेदार शिक्षणाचा निश्चितपणे अभाव जाणवून आला. काही प्रमाणात या प्रणालीने शैक्षणिक विषमतादेखील निर्माण केली. नवीन शैक्षणिक धोरणात मात्र सर्वांगीण विचार करण्यात आल्याचे दिसून येते. ५-३-३-४ अशी शैक्षणिक प्रणाली असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्येच शिक्षण सोडल्यास झालेल्या शिक्षणाचेदेखील प्रमाणपत्र मिळणार आहे. पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल व चार वर्षांत ऑनर्स’ झालेला विद्यार्थी थेट ‘पीएचडी’ला नोंदणी करू शकेल, अशी माहिती डॉ.काणे यांनी यावेळी दिली.सद्यस्थितीत देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आले आहे. हे धोरण शिक्षणाची दिशा बदलविणारे ठरू शकते. यातून शिक्षकांचा ‘माईंडसेट’ बदलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता एका विद्यार्थ्याला कितीही अभ्यासक्रम घेता येतील. याशिवाय संशोधन, केवळ शिक्षण यासाठी विविध विद्यापीठे व महाविद्यालये असतील. केवळ शोधपत्रिका म्हणजेच संशोधन ही संकल्पना मोडित निघेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक समस्या व मुद्दे लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करता येणार आहेत, असे डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. विद्यापीठ शिक्षण मंचचे सचिव डॉ.संजय दुधे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांनी वैयक्तिक गीत सादर केले तर डॉ.अमिषी अरोरा यांनी संचालन केले.
नवीन शैक्षणिक धोरण सकारात्मक बदल घडवेल : सिद्धार्थविनायक काणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:42 AM
वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत सकारात्मक व आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर गुरुवारी मंथन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर मंथन