नागपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक ‘पॅकेज’मुळे सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना नवीन उर्जा मिळणार आहे. भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर बनविण्यात या उद्योगांची मोठी भूमिका राहणार आहे. या उद्योगांकडे भांडवल प्रवाहित करणे हे त्यातील पहिले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे मत केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांचा मोठा वाटा आहे. एका दृष्टीने त्यांना अर्थव्यवस्थेचा कणादेखील म्हणू शकतो. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी ग्रामीण उद्योगांना मजबूती आवश्यक आहे. संकटाच्या काळात याबाबत आमची जी अपेक्षा होती ती पंतप्रधानांनी भविष्यातील प्रगतीचा पाया रचून पूर्ण केली आहे. सरकारच्या या पावलामुळे या उद्योगांना मोठा आधार मिळाला आहे. या उद्योगांशी जुळलेल्या ११ कोटींहून अधिक लोकांना दिलासा मिळाला आहे. हे उद्योग टिकतील व पुढे आणखी वेगाने प्रगती करतील. देशाच्या अर्थव्यवस्थेत सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांचा २९ टक्के इतका वाटा आहे. येत्या काळात ही टक्केवारी निश्चित वाढेल. यातूनच देश आर्थिक महासत्तेकडे मार्गक्रमण करेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.