लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाच्या संविधान निर्मितीच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी डोळ्या समोर एक ‘व्हिजन’ ठेवले होते. नवभारताची उभारणी करत असताना देशातील पुढील पिढ्यांना सर्वांगिण विकासाची समान संधी मिळावी हा त्यांचा मानस होता. त्यांनी संविधानात नैतिक मूल्यांचा अंतर्भाव केला होता. नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीमधील योगदान व मूलभूत अधिकार’ या विषयावर ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. आपले संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या वैश्वीक मूल्यांवर आधारित आहे. भारत नावाच्या राष्ट्राची पुनर्रचना निर्माण व्हायला हवी. जातीविहीन समाज घडायला हवा, असा त्यामागचा दृष्टीकोन होता. देशातील तत्कालिन सामाजिक परिस्थिती आणि भविष्याचा वेध घेऊन तयार करण्यात आलेले भारतीय संविधान हे भारतीय समाजाची आधुनिकीकरणाची शक्तीशाली प्रेरणा ठरले. संविधानामुळेच देशात परिवर्तन घडून आले. जगभरातील विधीतज्ज्ञांनीदेखील देशाच्या संविधानाची प्रशंसा केली आहे, असे डॉ.उके म्हणाले. नवीन पिढीपर्यंतच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.काणे यांनी केले. डॉ.प्रवीणा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले.
संविधानातील नैतिक मूल्यांचा नवीन पिढीने अंगिकार करावा : दिलीप उके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:23 AM
नवीन पिढीने संविधानातील नैतिक मूल्यांचा अंगिकरा करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन