लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलॉईन शॉपिंगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनांसाठी ग्राहकपेठा शोधण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा आणि हातमाग वस्त्रोद्योगातील उपलब्ध संधी शोधाव्यात. शासनाच्या इंद्रायणी अॅपच्या धर्तीवर विणकर सेवा केंद्रानेही अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी येथे केले.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत सिव्हील लाईन्स येथील विणकर सेवा केंद्र येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक वाय. के. सूर्यवंशी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वदेशी चळवळीचा प्रारंभ दिन म्हणून ७ ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून २०१७ पासून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे साजरा करण्यात येतो. पुढील राष्ट्रीय हातमाग दिवस भुवनेश्वर येथे साजरा होणार आहे. विणकर सेवा केंद्रातील प्रशिक्षणार्थींना बुटीक, फॅशन डिझायनिंग यासारख्या क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे खोडे यांनी साांगितले.पार्डीकर म्हणाले, हातमाग उत्पादनासंदर्भात योग्य प्रचार व प्रसार गरजेचा आहे. सूर्यवंशी म्हणाले, हातमाग हा भारतीय परंपरेचा भाग असून, लुप्त होत असलेल्या या कलेचे पुनरुज्जीवन करण्यात विणकरांचे योगदान महत्त्वाचे आहे.याप्रसंगी हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विणकर आणि तरुण उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर आणि विणकर सेवा केंद्र, यंत्रमाग सेवा केंद्र या कार्यालयातील अधिकारी, प्रशिक्षणार्थी उपास्थित होते. संचालन विणकर सेवा केंद्राचे सौम्य श्रीवास्तव यांनी केले तर तंत्रज्ञान अधीक्षक पुनित पाठक यांनी आभार मानले.
नवीन पिढीने हातमाग क्षेत्रातील संधी शोधाव्यात :आयुक्त माधवी खोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:10 AM
ऑनलॉईन शॉपिंगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनांसाठी ग्राहकपेठा शोधण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा आणि हातमाग वस्त्रोद्योगातील उपलब्ध संधी शोधाव्यात , असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी येथे केले.
ठळक मुद्देराष्ट्रीय हातमाग दिवस