- योग्य स्टार्टअप्सला मिळेल फंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीमसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. या अंतर्गत केवळ योग्य स्टार्टअप्सलाच योग्य इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून फंड दिले जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया (आयसीएआय), नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष महेश राठी यांनी दिली.
फंड प्राप्त करण्यासाठी स्टार्टअप डीपीआयआयटीकडून मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे. आवेदनाच्या वेळी स्टार्टअपची सुरुवात दोन वर्षापेक्षा आधी सुरू झालेली नसावी. स्टार्टअपकडे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या विकासासाठी बिझनेस आयडिया असणे गरजेचे आहे. आपल्या कोर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा बिझनेस, डिस्ट्रिब्युशन मॉडलसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणाऱ्या स्टार्टअपला फंड देण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे. जसे वेस्ट मॅनेजमेंट, सोशल इम्पॅक्ट, जल व्यवस्थापन, शिक्षण, कृषी, खाद्य प्रसंस्करण, बायो टेक्नोलॉजी, हेल्थ केअर, ऊर्जा, मोबिलिटी, डिफेन्स, स्पेस, रेल्वे, तेल, गॅस, टेक्सटाइल आदी क्षेत्रात इनोव्हेटिव्ह सोल्यूशन प्रदान करणारे स्टार्टअप्स यांना प्राधान्य असणार आहे. यासोबतच स्टार्टअपद्वारे कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये किंवा यापेक्षा अधिकची मदत घेतलेली असावी. यात स्पर्धेत जिंकलेली रक्कम, फाऊंडर मंथली अलाऊन्स आदींचा समावेश आहे. स्टार्टअपमध्ये भारतीय प्रमोटर्सची शेअर होल्डिंग आवेदनाच्या वेळी किमान ५१ टक्के असणे अनिवार्य आहे. कोणत्याही स्टार्टअपला एकापेक्षा अधिक सीड सपोर्ट दिला जाणार नाही. योग्य स्टार्टअपला इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून २० लाख रुपयांपर्यंत सीड फंड दिला जाऊ शकणार आहे.
.............