नागपूर : करदात्यांची कामे लवकर होऊन त्यांना दिलासा मिळावा म्हणून आयकर विभागाने जुनी वेबसाईट बंद करून नवीन वेबसाईटचे उद्घाटन केले; पण तांत्रिक अडचणींमुळे ही साईट गेल्या १३ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रोफेशनल आणि करदात्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय फायलिंग होत नसल्याने ते त्रस्त आहेत.
सीएंनी सांगितले, वेबसाईटवर आताही सामान्य लॉगिंग, नोटिसांचे उत्तर देणे आणि अन्य सुविधा पूर्णपणे बंद आहेत. या साईटचे उद्घाटन ७ जूनला झाले होते. करदात्यांना तातडीने सेवा मिळाव्यात, या उद्देशाने नवीन साईट सुरू करण्यात आली होती; पण करदात्यांनी पहिल्याच दिवसापासून तक्रारी सुरू केल्या. त्यांचे निदान अजूनही झालेले नाही. करदाते पूर्वीच्या ई-फाईल रिटर्न पाहू शकत नाहीत. याशिवाय वेबसाईटच्या माध्यमातून करदात्यांना अनेक सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत.
वेबसाईटमधील तांत्रिक दुरुस्तीसाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन साईट बनविणारी कंपनी इन्फोसिसला आदेश दिला होता. नंदन नीलेकणी यांना समस्या सोडविण्यास सांगितले होते; पण त्या अजूनही सोडविता आल्या नाहीत. त्याचा त्रास करदात्यांना होत आहे. याचप्रमाणे जीएसटी पोर्टल बनविण्याची जबाबदारी इन्फोसिसला दिली होती. त्यातच प्रारंभी अनेक अडचणी आणि समस्या आल्या होत्या. आताही त्या येतच आहेत. वेबसाईटशी जुळल्यानंतर तासानंतर काम होते. सरकारने या पोर्टलकडे लक्ष देऊन तोडगा काढण्याचे आवाहन सीएंनी केले आहे.
अन्य सेवा व फाइलिंग बंद
वेबसाईटचे उद्घाटन ७ जूनला झाले. तेव्हापासूनच तांत्रिक कारणांनी साईटने काम करणे बंद केले आहे. साईट उघडतच नाही. शिवाय पूर्वीचा डाटाही मिळत नाही. त्यातील तांत्रिक त्रुटी लवकरच सोडवाव्यात. तसे पाहता जुन्या साईटमध्ये अडचणी नव्हत्या. त्यानंतरही शासनाने नवीन साईट दाखल केली. २२ जूनला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची इन्फोसिससोबत बैठक होणार आहे. त्यानंतरच तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
- वरिष्ठ सीए कैलास जोगानी