नागपूर : मुळची विदर्भाची मात्र नंतर दुसऱ्या प्रांतात स्थायिक झालेली नवी लुटरी दुल्हन नागपुरात सक्रिय झाली आहे. मेट्रीमोनियलच्या माध्यमातून ती श्रीमंत मात्र एकाकी सावज शोधते आणि नंतर त्याच्याशी सलगी वाढवते. सावज जाळ्यात आल्यानंतर त्याच्याकडून खाणे-पिणे, रुपये, 'सोने' असे सर्व काही घेते अन् आपली बॅग भरून राजरोसपणेे निघूनही जाते. नुकतेच तिने एका ज्येष्ठ नागरिकाला पती बणविण्याच्या नावाखाली आर्थिक गंडा घालून मामा बनविले आहे.
फसगत झालेले काका शहराच्या पश्चिमेला राहतात. पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मोठे घर आहे मात्र जीव लावलारे कुणी जवळ नसल्याने काका एकाकी आहेत. मित्रांच्या सल्ल्यावरून त्यांनी साथीदार शोधण्यासाठी लग्नाच्या गाठी बांधणाऱ्या संकेतस्थळावर संपर्क केला. त्यांच्या हाकेला मराठवाड्यातील एका ५७ वर्षीय सुस्वरूप महिलेने साद दिली. काही दिवस ऑनलाईन चॅटिंगमध्येे गेले. यावेळी तिने सामाजिक प्रतिष्ठेची जाणीव करून देण्यासाठी 'आपली अनेक नेत्यांसोबत दोस्ती' असल्याचे काकांना सांगितले. अशात एक दिवस ही महिला थेट बॅग घेऊन काकांच्या घरी पोहचली. प्रारंभी तिने काकांशी लग्न करण्याची आणि नंतर लिव्ह ईन मध्ये राहण्याची तयारी दाखवून त्यांना सोबत राहण्याची गळ घातली.
दरम्यान, काकांसोबत दीड दोन महिन्यांचा 'संसार' करताना तिने काकांडून दीड लाखांचे सोने सोडवून आणले. त्यानंतर काकांना स्वतंत्र घर घेऊन देण्यासाठी तगादा लावला. काका, हुशार. त्यांनी सबुरिने घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा मात्र तिने आपले खरे रूप दाखविले. कुरबूर वाढताच जे काही समेटता येईल ते समेटून तिने काकांचे घर सोडले. काकांनी संपर्क केला असता, ती नागपुरातच दुसरीकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, ईकडे तिकडे कुठे बोललात किंवा पुढचे कोणते पाऊल टाकले तर या वयात प्रतिष्ठेला काळे फासणारे आरोप लावून फसवेन, अशी धमकी तिने काकांना दिली आहे. तिने केलेल्या फसवणूकीमुळे काका अस्वस्थ झाले आहेत.
ती अन्य मित्रांच्याही संपर्कात
फसगत झालेल्या काकांच्या मते ती सोबत राहताना तिच्या अन्य मित्रांच्याही निरंतर संपर्कात असायची. त्यामुळे ही लुटेरी दुल्हन असून तिने यापूर्वी अशा प्रकारे अनेकांना चुणा लावला असावा, असा काकांना दाट संशय आहे. तिने जे आपल्यासोबत केले, ते पुढे दुसऱ्या कुणासोबत करू नये, अशी त्यांची ईच्छा आहे.
ही चवथी आवृत्ती
नागपुरात गेल्या दोन-तीन वर्षांत उघड झालेली 'लुटरी दुल्हन'ची ही चवथी आवृत्ती आहे. प्रारंभी एकीवर पाचपावली ठाण्यात, नंतर दुसरीवर जरीपटका ठाण्यात तर तिसरीविरुद्ध मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हिच्या रुपातून लुटेरी दुल्हनची चवथी आवृत्ती पुढे आली आहे.