लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा नवीन आदेश जारी करता येईल. परंतु, त्यापूर्वी याचिकाकर्ते स्वानंद सोनी यांना सुनावणीची संधी देण्यात यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी गेल्या २० मार्च रोजी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी केला होता. त्याविरुद्ध स्वानंद सोनी यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पहिल्याच सुनावणीनंतर वादातीत आदेशावर स्थगिती देऊन वन विभागाला स्पष्टीकरण मागितले. दरम्यान, १० एप्रिल रोजी त्या आदेशाची मुदत संपली. त्यामुळे न्यायालयाने वरील बाबी स्पष्ट करून याचिका निकाली काढली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.वाघिण सध्या सिंदेवाही परिसरातील शेतांमध्ये फिरत आहे. वाघिणीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वाघिणीचा माणसांशी संघर्ष होऊ नये यासाठी तिला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. तिला पकडून जंगलात सोडण्याचा वन विभागाचा उद्देश होता. तो आदेश अवैध होता, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. वाघिणीला चार बछडे आहेत. बेशुद्ध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते एकमेकांपासून दुरावू शकतात. बछड्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अक्षय नाईक व अॅड. राहुल कलंगीवाले तर, वन विभागातर्फे अॅड. मेहरोज पठाण यांनी कामकाज पाहिले.
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील वाघिणीला बेशुद्ध करण्याचा नवीन आदेश शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 8:25 PM
स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा नवीन आदेश जारी करता येईल. परंतु, त्यापूर्वी याचिकाकर्ते स्वानंद सोनी यांना सुनावणीची संधी देण्यात यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.
ठळक मुद्देहायकोर्ट : याचिकाकर्त्याला मिळेल सुनावणीची संधी