नागपूर ; येथील रेल्वेच्या पार्सल कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवारी ई लिलावाच्या माध्यमातून पार्सल स्कॅनरचा नवीन करार केला आहे. तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.रेल्वेतून जाणारे आणि येणारे प्रतिबंधित पार्सल तसेच पार्सल वाहतुक आणि प्रवासी गाड्यांमधील धोके शोधण्यासाठी हा करार करण्यात आला. संपलेल्या वर्षांतील करारानुसार आतापर्यंत ३९, ९५० पार्सल सुरक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. यातील ६० टक्के पार्सल रेल्वे कार्यालयातून बूक झाले होते तर ४० टक्के पार्सल एसएलआर / व्हीपीएस मार्फत बूक करण्यात आले होते. नव्या करारात नागपूर रेल्वे स्थानकावरून माल लोड होण्यापूर्वी सर्व प्रकारचे नॉन लिज पार्सल तसेच पार्सल ऑफिसमधून बूक केलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे स्कॅनिंग आवश्यक आहे.
पॅकेजचे योग्यप्रकारे स्कॅनिंग करून ते १०० टक्के सुरक्षित असल्याचे निश्चिंत करणे, बुकिंगसाठी सामान स्विकारण्यापूर्वी त्याचे स्कॅनिंग करणे आणि त्यावर सुरक्षेचे स्टीकर चिपकवणे, ऐनवेळी विजेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून स्टॅण्डबाय पॉवर सप्लाय , २४ तास मणूष्यबळ तसेच हॅण्डहेल्ड आणि स्कॅनर अशी दुहेरी व्यवस्था करण्याची जबाबदारी परवानाधारकावर टाकण्यात आली आहे. पार्सल धारकाकडून त्यासाठी ५ रुपये (नॉन लिज्ड पार्सल कन्साईनमेंट / लगेजसाठी) आणि ३ रुपये प्रति पॅकेज लिज्ड कन्साईनमेंट शुल्क घेतले जाणार असून रेल्वेला मात्र दर वर्षी ५.६७ लाख या प्रमाणे तीन वर्षांत सुमारे २० लाख रुपये मिळणार आहे.
बुकिंग काउंटरवर २४ तास यंत्रणासुरक्षेची खबरदारी म्हणून रेल्वे पार्सल बुकिंग काऊंटरवर २४ तास यंत्रणा अखंडितपणे सुरू राहणार आहे. यामुळे रेल्वेत पार्सलमुळे होणारी दुर्घटना रोखणे तसेच आगीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.