दिवाळीच्या सुट्यानंतर हायकोर्टात नवीन रोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:43 AM2018-11-03T10:43:26+5:302018-11-03T10:45:14+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिवाळीच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर लागू होणार आहे. हायकोर्टाला ३ ते १८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या आहेत. १९ नोव्हेंबरपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिवाळीच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर लागू होणार आहे. हायकोर्टाला ३ ते १८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या आहेत. १९ नोव्हेंबरपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल.
नवीन रोस्टरमध्ये न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्याकडे जनहित याचिका, १९९८ व त्यापुढील सर्व सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, सर्व लेटर्स पेटेन्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व स्वप्ना जोशी यांच्याकडे विषम वर्षांतील फौजदारी प्रकरणे तर, न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्याकडे १९९७ व त्यापुढील सर्व विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स व सम वर्षांतील फौजदारी प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एक सदस्यीय न्यायपीठातील न्या. झेड. ए. हक यांच्याकडे सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ व ४०७ अंतर्गतचे अर्ज, न्या. विनय देशपांडे यांच्याकडे फौजदारी अपील्स व अर्ज, फौजदारी याचिका, न्या. रोहित देव यांच्याकडे द्वितीय अपील्स, दिवाणी सुधार अर्ज, न्या. मनीष पितळे यांच्याकडे विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, न्या. अरुण उपाध्ये यांच्याकडे प्रथम अपील्स व अपील्स फ्रॉम आर्डर्स, जिल्हा न्यायालयातील दिवाणी अवमानना संदर्भ, सर्व किरकोळ अर्ज तर, न्या. मुरलीधर गिरटकर यांच्याकडे नियमित व अटकपूर्व जामीन अर्जांची जबाबदारी राहील.
अशी राहील सुट्यांमधील व्यवस्था
दिवाळीच्या सुट्यांमध्ये तातडीने सुनावणी घेण्याची गरज असणारी प्रकरणे ऐकण्यासाठी न्या. अरुण उपाध्ये व न्या. मनीष पितळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यामध्ये न्या. उपाध्ये तर, दुसऱ्या आठवड्यामध्ये न्या. पितळे हे मंगळवारी व शुक्रवारी या दोन दिवशी न्यायालयीन कामकाज करतील.