नागपूर : ‘एटीएम’ मशीनमध्ये ‘स्केल’सदृश पट्टी टाकून पैसे काढणाऱ्यांच्या रॅकेटचा भंडाफोड झाल्यानंतर बँकिंग वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आता एका टोळीने त्याहून पुढे जात ‘व्हाइट कॉलर’ चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘एटीएम’ मशीनमधून पैसे काढत असतानाच ‘झोल’ करत विशिष्ट ‘प्लग’ बंद केले जाते. त्यामुळे ‘कॅश’ तर निघते, मात्र खातेधारकाच्या खात्यावर तशी नोंद होत नाही व खात्यावर पैसे परत येतात. अशा पद्धतीने सद्य:स्थितीत एका बँकेकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली असली तरी संबंधित व्यक्तींनी इतरही बँकांना चुना लावल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने ‘आरबीएल’ बँकाला या पद्धतीने चुना लावला आहे. सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार रक्कम जास्त नसली तरी ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांना चिंतित टाकणारी आहे. सेंट्रल बाजार मार्गावर ‘आरबीएल’ बँकेचे एटीएम आहे. संबंधित मशीनमध्ये मागील वर्षी ७ ऑक्टोबर रोजीचा प्रकार बँकेच्या मुख्यालयाच्या लक्षात आला. एका व्यक्तीने एटीएममध्ये येत दुसऱ्या बँकेचे कार्ड टाकले व १० हजार रुपयांची रक्कम काढण्याची प्रक्रिया केली. ज्यावेळी पैसे मशीनमधून अर्धवट बाहेर येत होते, तेव्हा ते ओढून घेत क्षणात ‘एटीएम’चा विशिष्ट ‘प्लग’ बंद केला. यामुळे मशीन बंद झाली.
संबंधित व्यक्तीला रोख पैसे मिळाले; परंतु तांत्रिक ‘अल्गोरिदम’मुळे त्याच्या बँक खात्यात पैसे परत गेल्याची नोंद झाली. याचाच अर्थ त्याने पैसे काढले असले तरी प्रत्यक्षात बँकेच्या लेखी त्याने एकही रुपया काढला नव्हता. असा प्रकार त्याने एकाच दिवसात सात वेळा केला. विविध प्रकारचे ऑडिट होत असताना बँकेच्या मुख्यालयाकडून नोंदी तपासण्यात येत होत्या. त्यावेळी हा घोळ समोर आला. याची माहिती तातडीने नागपूर शाखेला देण्यात आली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी बजाजनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
देशात अनेक ठिकाणी ‘झोल’; असा समोर आला घोळ
बँकेकडून मागील वर्षीच्या नोंदी तपासण्यात येत असताना संबंधित एटीएममध्ये भरलेली रक्कम व काढण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ बसत नव्हता. यासंदर्भात मुख्य शाखेकडून स्थानिक अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यात आला. यानंतर चौकशी करण्यात आली असता ७० हजार रुपयांच्या ‘ट्रान्झॅक्शन’वर संशय बळावला. ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने हा प्रकार केला असल्याची बाब समोर आली. देशातील काही ठिकाणी असा प्रकार या अगोदरही झाला असून, पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेदेखील दाखल झाले आहेत.