नागपूर : लहान बाळांच्या विक्रीच्या रॅकेटमध्ये एका डॉक्टरचादेखील समावेश असल्याचे आरोप झाल्यावर वैद्यकीय वर्तुळातदेखील खळबळ उडाली होती. अहमदाबाद येथे बाळविक्रीच्या प्रकरणात ज्या डॉक्टरच्या नावाखाली श्वेता खानने दाम्पत्याकडून पैसे उकळले होते, त्याचीदेखील दिशाभूल केल्याचा दावा खुद्द डॉक्टरने केला आहे.
डॉ. प्रवीण बैसशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता मी फक्त बाळाची तपासणी केली होती. श्वेता व संबंधित दाम्पत्याने पोलिस चौकशीत माझ्याबाबत चुकीची माहिती देऊन फसविले असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनादेखील डॉक्टरने असेच सांगितले असून या दाव्यात किती तथ्य आहे याची चौकशी सुरू आहे.
संबंधित डॉक्टरच्या ‘क्लिनिक’ला कुलूप होते. त्यानंतर मोबाइलवर संपर्क केला असता डॉक्टरने श्वेता खानबाबत काही खुलासे केले. श्वेता खानसोबत डॉ. बैसची चार ते पाच वर्षांपासून ओळख होती. ती धंतोलीतील एका मॅटर्निटी होममध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. त्यावेळी सिझरीनच्या दोन-तीन प्रकरणात डॉ. बैसची तिच्याशी ओळखी झाली होती. कोरोना काळात ती छत्रपती चौकातील क्लिनिकमध्ये भेटली होती. त्यानंतर तिच्याशी कधीच भेट झाली नव्हती. सप्टेंबर महिन्यात ८ सप्टेंबर रोजी ती एका नवजात बाळाला घेऊन ती क्लिनिकमध्ये पोहोचली. सोबत गुजरातचे दाम्पत्य होते.
एका सिंधी परिवारातील मुलाला परस्पर संमतीने दत्तक देत असल्याचे श्वेता खानने डॉक्टरला सांगितले. बाळ ठीक आहे की नाही याची तपासणी करायला सांगितली. मी बाळाची सामान्य तपासणी केली होती. मात्र रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतील व थॅलेसेमियाची तपासणी करून घ्या असे सुचविले होते. यानंतर संबंधित दाम्पत्यातील महिला रडायला लागली व अगोदरचे मूल त्याच आजाराने गेले होते, असे म्हणायला लागली. सामान्य तपासणीचे प्रमाणपत्र रेल्वे प्रवासात बाळाची ओळख म्हणून वापरता येईल का अशी विचारणादेखील दाम्पत्याने केली होती. तेव्हा मी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यानंतर चारशे रुपये तपासणी शुल्क देऊन श्वेता खान त्यांना घेऊन निघून गेली होती.
नंतर समजले रॅकेट
हे बाळाच्या खरेदी-विक्रीचे रॅकेट होते हे मला नंतर पोलिसांकडून समजले. त्यांनी पोलिसांकडे माझे नाव घेतल्याने आश्चर्य वाटले. तसेच मी प्रत्येक बाळाची तपासणी करतो असे बयाण श्वेता व महिलेने दिले होते. याबाबत मी पोलिसांसमोरच दोघांना विचारणा केली असता तुमच्यावर आरोप टाकून सुटण्यासाठी असे केल्याची कबुली महिलेने दिली. श्वेतानेच माझे नाव यात फसवले असा आरोप डॉ. बैस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. त्यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याची विचारणा करण्यासाठी उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना संपर्क करण्यात आला.
दत्तकप्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला
संबंधित बाळ महिलेचे नसून नातेवाइकाचे असल्याचे श्वेता खानने सांगितल्यावर मी त्यांना या भविष्यातील अडचणींबाबत अवगत करून दिले. अधिकृतपणे दत्तकप्रक्रिया पूर्ण करा व दत्तकपत्र घ्या असा सल्लादेखील दिला होता. याशिवाय ही प्रक्रिया कशी व कुठून होते याची माहितीदेखील दिली होती, असे डॉ. बैसने सांगितले.