लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.वीज नियामक आयोगाकडून या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून २० टक्के भागभांडवल मिळण्यासाठ़ी प्रस्ताव सादर करण्यासही मान्यता देण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा विजेची सर्वाधिक मागणी २५ हजार मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली आहे. तसेच १९ व्या ऊर्जा सर्वेक्षणानुसार अनुमानित केलेली विजेची मागणी २०३६३ मेगावॉट आहे. त्यापेक्षाही अधिक मागणीची नोंद यंदा झाली आहे.महावितरणच्या पुनरावलोकनानुसार सन २०२३-२४ मध्ये २७०० पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन २०१२३-२४ साठ़ीचा २५ हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता २०१९ मेगावॅट विजेची तूट भासू शकते. महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता १३६०२ मेगावॉट असून त्यापैकी १०१७० मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी महानिर्मितीचे १६८० मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.ही वस्तुस्थिती लक्षात घेता २ बाय ६६० मेगावॉट नवीन संचाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. सध्या संच क्रमांक १ ते ४ बंद आहेत. या संचांच्या इमारती व संरचना हटवून ती जागा नवीन संचासाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे नवीन संचांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रस्तावित संचांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कोराडी वीज केंद्र येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्वीच यार्डमध्ये आवश्यक ते बदल करून त्याद्वारे निर्गमित होऊ शकते.या प्रकल्पात संच क्रमांक १ काम पूर्ण होण्यासाठी ४५ महिने व संच क्रमांक २ पूर्ण होण्यासाठी ५१ महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के रकक्म कर्ज रूपाने तर २० टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.संच क्रमांक ६ चे नूतनीकरण जागतिक बँकेच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्राच्या पुनर्वसन प्रकल्पानुसार महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक ६ चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४८६ कोटी व महाराष्ट्र शासनाकडून ९६ कोटींच्या भागभांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास ५६३.१२ कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.