नागपूर : कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढली आहे. युरोपातील काही देशांमध्ये तिसऱ्या लाटेने जनजीवन अत्यवस्थ झाले असतानाच हा व्हेरियंट म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे नागपुरातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नवा व्हेरियंट जास्त आक्रमक ठरू शकतो- डॉ. जय देशमुख
ज्येष्ठ फिजीशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, दक्षिण आफिक्रेतील कोरोनाचा नवा व्हेरियंटकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. या व्हेरिएंटची ओळख पटवण्यात आली असून दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँग या देशांमधील नागरिकांसाठी धोका वाढल्याचे चित्र आहे. हा व्हेरियंट अधिक आक्रमक व संसर्गजन्य ठरू शकतो. भारतातही येण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे आपल्यासाठी डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी हे तीन महिने महत्त्वाचे ठरणार आहे. ‘फर्स्ट लाईन वर्कर’ व ‘हायरिस्क’ रुग्णांच्या तिसऱ्या डोसबाबत गंभीरतेने विचार होणे व त्याची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे. संसर्ग थांबविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे.
नवा व्हेरियंट हा ट्रिपल म्युटंट - डॉ. सुशांत मेश्राम
मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे तज्ज्ञ व कोवीड विशेषज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, साऊथ आफिक्रेत आढळून आलेला नवा व्हेरियंट हा ‘ट्रिपल म्युटंट’ म्हणजे तिसऱ्यांदा उत्परिवर्तीत झाला आहे. हा ‘डेल्टा व्हेरियंट’ पेक्षा वेगळा आहे. हा कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे निर्माण झालेल्या अण्टीबॉडीजलाही जुमानणारा नसावा, अशी शक्यता आहे. यावर एकच उपाय म्हणजे, या व्हेरियंटचा संसर्गाचा फैलाव रोखणे. यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. हायरिस्क असलेल्या म्हणजे, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाच्या रुग्णांची, ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नवा व्हेरिंयटसाठी पुढील १५ दिवस महत्त्वाचे-डॉ. नितीन शिंदे
संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे, म्हणाले, दक्षिण आफिक्रेत दिसून आलेल्या कोरोनाचा नवा व्हेरियंटची माहिती कमी आणि चर्चाच जास्त आहे. यामुळे पुढील १५ दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हेरीयंट किती वेगाने पसरतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या व्हेरियंटमुळे भारताला धोका आहे, असे म्हणणे घाईचे होईल. कारण, या व्हेरियंटचे साऊथ आफिक्रेत जवळपास ५९ रुग्ण आढळून आले. यातील ६१ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. उर्वरीत ५० टक्के रुग्णांनी एकच डोस घेतला आहे. यामुळे याचा आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे. भारतात लसीकरणाची गती आणखी वाढवायला हवी. ज्यांचे दोन डोस झाले त्यांना तिसºया डोस देण्याबाबत लवकरन निर्णय घ्यायला हवे.