नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तामिळनाडू व महाराष्ट्राच्या इतरही भागात आढळून आलेला ओमायक्रॉनचा ‘बीए.५’ या सबव्हेरिएंटचे दोन तर ‘एसक्यू’ सबव्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. परंतु तिन्ही रुग्ण घरीच उपचाराने बरे झाले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयावह ठरली. या लाटेत ‘डेल्टा’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली. परंतु तिसरी लाट सौम्य राहिली. ‘ओमायक्रॉन’ या विषाणूचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. आता चौथ्या लाटेसाठी ओमायक्रॉनचा उपप्रकार (सबव्हेरिएंट) कारणीभूत ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) प्रयोगशाळेतील जनुकीय चाचणीसाठी काही दिवसापूर्वी १०२ नमुने पाठविण्यात आले होते. त्यात ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट ‘बीए.५’चे दोन तर, ‘एसक्यू.’चा एक रुग्ण आढळून आला.
- रुग्णाची केरळ, मुंबई व पाटणा प्रवासाची पार्श्वभूमी
‘बीए.५’ विषाणूची बाधा झालेला २९ वर्षीय पुरुष हा केरळहून ४ जूनला, तर ५४ वर्षीय महिला ही मुंबईहून ६ जूनला नागपुरात परतली होती. याशिवाय, ‘एसक्यू’ विषाणूची बाधा झालेला ४९ वर्षीय पुरुष हा पाटण्यावरून आला होता. या तिघांनाही सर्दी, खोकला, ताप यासह इतर लक्षणे होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने यांचे नमुने महापालिकेने जनुकीय चाचणीसाठी नीरीच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. तिघांचेही संपूर्ण लसीकरण झाले आहे. मागील दोन ते तीन दिवसापूर्वी या रुग्णांची सात दिवसाच्या गृहविलगीकरणातून सुटका झाली आहे.
-‘बीए.२’ व ‘बीए.३’चे अधिक रुग्ण
महानगरपालिकेच्या वतीने रोज जवळपास ४० ते ५० नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले जातात. यात आतापर्यंत ओमायक्रॉन ‘बीए.२’ व ‘बीए.३’या सबव्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले होते. यातील बहुसंख्य रुग्णांना सौम्य लक्षणे होती. घरी राहूनच ते बरे झाले, असेही सांगण्यात येते.
- रुग्ण वाढीसाठी ‘बीए.५’ कारणीभूत नाही
नागपुरात मागील काही दिवसापासून रुग्णात झालेली वाढ ही ‘बीए.५’ किंवा ‘एसक्यू’ रुग्णांच्या संपर्कामुळे नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. यामुळे भीती बाळगू नका, खबरदारी घ्या, मास्क लावा, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.
- या विषाणूंचे आयुष्य चार दिवसाचे
‘बीए. ४’ व ‘बीए. ५’ या सबव्हेरिएंटचे रुग्ण अनेक ठिकाणी आढळून येत आहेत. या दोन्ही विषाणूंचे मानवी शरीरातील आयुष्य तीन ते चार दिवसाचेच असते. त्यामुळे रुग्णामध्ये तीन ते चार दिवस सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यानंतर रुग्णाकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
- डॉ. नितीन शिंदे, तज्ज्ञ संसर्गजन्य आजार