नागपूर : भारताची एक आलिशान सुपर फास्ट ट्रेन म्हणून ओळखली जाणारी 'वंदे भारत' आणखी नव्या रंग रुपात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) सुधारित आणि नव्या वैशिष्ट्यांसह वंदे भारत ट्रेनची नवीन आवृत्ती तयार केली जात आहे. आयसीएफ चेन्नईने आतापर्यंत विविध गाड्यांसाठी २७०२ डबे तयार केले. ज्यात वंदे भारत ट्रेनच्या नवीन आवृत्तीचे १२ डबे आणि रेल्वे बोर्डाने दिलेल्या टार्गेटनुसार २२६१ एलएचबी डब्यांचा समावेश आहे. तांत्रिक सुधारणांसह अधिक प्रगत सुरक्षेला नजरेसमोर ठेवून २५ वंदे भारत ट्रेन निर्मितीची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्याच प्रमाणे पुढच्या काही वर्षांत वंदे भारत एक्सप्रेस तसेच नवीन प्रकारच्या गाड्यांसह सुमारे ३० प्रकारांमध्ये ३२४१ कोच तयार करण्याची आयसीएफची योजना असल्याचेही सांगितले आहे.
जम्मू आणि काश्मीर मधील वातावरण लक्षात घेऊन वंदे भारत ट्रेन देखील विकसित केली जात आहे, ज्यात कोचमध्ये वातावरण गरम करण्याची सुविधा तसेच पाण्याच्या लाईन्स गोठणार नाही, अशी सुद्धा व्यवस्था राहणार आहे. पुढील वर्षी ही ट्रेन सुरू होणार आहे.तर, वंदे मेट्रो नावाच्या वंदे भारत ट्रेनची दुसरी आवृत्ती पुढच्या काही महिन्यातच सुरू होणार आहे. ही ट्रेन आंतरशहर कमी अंतराच्या प्रवाशांच्या प्रवासाची पूर्तता करेल. यात प्रवाशांच्या सहज बोर्डिंग आणि डी-बोर्डिंगसाठी दुहेरी दाराची व्यवस्था राहणार आहे.
निर्माणाधीन वंदे भारत ट्रेनच्या नवीन आवृत्तीची सुधारित वैशिष्ट्ये
- आसन व्यवस्था अधिक प्रशस्त-लांब अंतराच्या वंदे भारतमध्ये सुधारित स्लीपर व्यवस्था
- मोबाइल चार्जिंग पॉईंटवर पूर्वीपेक्षा चांगली व्यवस्था.- एक्झिक्युटिव्ह चेअर कार क्लास डब्यांमध्ये विस्तारित जागा.
- खोल वॉश बेसिन- टॉयलेटमध्ये उत्तम प्रकाशयोजना
- दिव्यांग प्रवाशांच्या व्हील चेअरसाठी पॉइंट्स निश्चित करण्याची तरतूद.- रेझिस्टिव्ह टच ते कॅपेसिटिव्ह टच रीडिंग लॅम्प टचिंगमध्ये बदल
- उत्तम सुरक्षिततेसाठी रोलर ब्लाइंड फॅब्रिक आणि अँटी क्लाइंबिंग डिव्हाइस.