लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : निवडणूक आयाेगाच्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नाेंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नाेंदणी अधिकारी जाेगेंद्र कट्यारे व तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.
निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार, १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२२ राेजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नाेंदणी करणे शक्य हाेणार आहे. तसेच नाव वगळणे, यादीतील मजकूर दुरुस्ती करणे, एकाच मतदार संघात एका भागातून दुसऱ्या भागात नाव स्थानांतरित करणे, याबाबत मतदार नाेंदणी अधिकारी किंवा मतदार मदत केंद्र कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन www.nvsp.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा. या कार्यालयात नमुना ६, ७, ८, ८ अ उपलब्ध केला आहे.
आगामी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपले नाव मतदार यादीत तपासून पाहावे. नाव न आढळल्यास नमुना क्र. ६ सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. रामटेक विधानसभा मतदार संघातील सर्व पात्र मतदारांनी आपले नाव यादीत नाेंदवावे. ही अंतिम यादी मार्च-एप्रिल २०२२ मध्ये हाेऊ घातलेल्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीकरिता वापरण्यात येण्याची शक्यता असल्याने सर्व राजकीय पक्ष, नागरिक, संभाव्य उमेदवार यांनी या माेहिमेकडे विशेष लक्ष द्यावे, असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.