नागपूर : नागपुरातील प्रभाग रचना कशी राहील हे येत्या १ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. यासोबतच महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे आपापल्या कामाला लागतील. तसे पाहिले तर फेब्रुवारी महिन्यात निवडणुका व्हायला हव्या होत्या; परंतु संपूर्ण फेब्रुवारी महिना हा प्रभाग रचनेला अंतिम रूप देण्यासाठीच लागेल. त्यानंतर आरक्षित प्रभागांचे ड्रॉ काढण्यात येतील. नंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. अशा परिस्थितीत आगामी महापालिका निवडणुका या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्यातर्फे नागपूर महापालिका निवडणूक २०२२ च्या प्रभाग रचना, आक्षेप व सूचना मागवण्यात आल्या असून, सुनावणीच्या तारखांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार १ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. यापूर्वी निवडणूक आयोगाने कच्च्या प्रारूपाची एक प्रत ६ जानेवारी रोजी सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्या आधारावर महापालिकेतर्फे प्रारूपाची प्रत मुंबई येथील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सोपवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले होते; परंतु त्या दरम्यान निवडणूक आयोगाचे अधिकारी-कर्मचारी कोरोनासंक्रमित असल्यामुळे प्रारूप यादी सोपवून ते परत आले हाेते. दरम्यान, कोरोना संक्रमणही वाढले. त्यामुळे कार्यक्रम जाहीर होण्यास उशीर झाला. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या, हे विशेष.
- महापालिकेची तयारी पूर्ण
निवडणूक आयोगातर्फे प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यानुसार महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. प्रभागांचा नकाशा प्रकाशित करणे, आपत्ती व सूचना मागविणे, त्या नोंदवणे आणि निवडणूक आयोगाकडे मंजूर करण्याची प्रक्रिया ठरलेल्या कालावधीत पूर्ण केली जाईल.
- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
- असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
- १ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
- १४ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्या नोंदविल्या जातील.
-१६ फेब्रुवारी रोजी प्राप्त हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाईल.
- २६ फेब्रुवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी होईल.
- २ मार्च रोजी सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविणे.
- ३ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक
- १५६ जागांसाठी उमेदवार मैदानात उतरणार
- नागपूर शहरात असतील ५२ प्रभाग
- २६ प्रभागांमध्ये एक पुरुष व दोन महिला सदस्यांसाठी जागा आरक्षित राहील.
- ७८ जागा महिलांसाठी आरक्षित राहतील.