नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी, नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या ४,९४,१०३ झाली असून मृतांची संख्या १०,१२३ वर पोहचली आहे. तब्बल ५० दिवसानंतर मृत्यूची नोंद झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ४,६६२ चाचण्या झाल्या. यात शहरात झालेल्या ३,०४५ चाचण्यांमधून ४७ तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,६१७ चाचण्यांमधून ५ तर जिल्हाबाहेरील २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज मृत्यू झालेला ६०वर्षीय रुग्ण हा चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. मागील काही दिवसांपासून नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हाबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या १,६२६ झाली आहे.
-शहरात २८७ तर ग्रामीणमध्ये २६ रुग्ण सक्रिय
कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात २८७, ग्रामीणमध्ये २६ तर जिल्हाबाहेरील ८ असे एकूण ३२१ रुग्ण सक्रिय होते. आज ३ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाºया रुग्णांची संख्या ४,८३,६५९ वर पोहचली आहे.
-२७ जुलैनंतर शहरात मृत्यूची नोंद नाही
शहरात २७ जुलै रोजी १ रुग्णाचा मृत्यूने मृत्यूची संख्या १०,११६ झाली. त्यानंतर आतापर्यंत शहरात मृत्यूची नोंद नाही. ग्रामीणमध्ये ७ आॅक्टोबर रोजी १ रुग्णाचा मृत्यू झाला तर, जिल्हाबाहेरील रुग्णांचा १ व १२ व ३१ आॅगस्ट रोजी, १६ सप्टेंबर रोजी १२ नोव्हेंबर रोजी व १ जानेवारी रोजी प्रत्येकी १ असे एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला. मागील ५ महिन्यात एकूण ८ रुग्णांचे मृत्यू झाले.