पाटणसावंगी/खापरखेडा : पाटणसावंगी-वाकी मार्गालगतच्या कडूनिंबाच्या झाडाखाली पाेत्यात गुंडाळून असलेले नवजात बाळ गुरुवारी (दि. १६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आढळून आले. बाळ (मुलगा) एक दिवसाचा असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली असून, त्याला उपचारार्थ नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती खाप्याचे ठाणेदार मनाेज खडसे यांनी दिली.
सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी-वाकी मार्गालगत छाेटे दर्गे आहेत. या राेडच्या वळणावर असलेल्या एका दर्ग्याजवळील कडूनिंबाच्या झाडाखाली असलेल्या पाेत्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने विष्णू बागडे या शेतकऱ्याचे लक्ष त्या पाेत्याकडे गेले. त्यांनी या प्रकाराची माहिती लगेच किशाेर चाैधरी, रा. दहेगाव (रंगारी) यांना दिली. माहिती मिळताच खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी घटनास्थळ गाठून बाळाला ताब्यात घेतले.
पाटणसावंगी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात त्याची तपासणी करून त्याच्यावर प्रथमाेपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी नागपूरला रवाना करण्यात आले. या बाळाला सकाळी आठ वाजताच्या सुमारास कुणीतरी झाडाखाली ठेवले असावे, असा अंदाज दर्ग्यातील नागरिकांनी व्यक्त केला. या बाळाबाबत कुणाला माहिती असल्यास अथवा मिळाल्यास पाेलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल, अशी माहिती ठाणेदार मनाेज खडसे यांनी दिली.
संपामुळे उपचारात अडचणी
बाळाला सुरुवातीला नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात नेण्यात आले. आराेग्य विभागाचे कर्मचारी संपावर असल्याने त्याला तिथून मेडिकल हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. बाळ बराच काळ उपाशी असल्याने त्याच्या शरीरातील शुगर आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाली हाेती. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्याच्यावर उपचार सुरू करण्यास दिरंगाई झाली.