नागपूर : जगात येऊन दोनच दिवस झाले असताना सैतानी डोक्याच्या बापाच्या संतापाचा सामना करावा लागलेल्या नवजात बाळाचा अखेर मृत्यू झाला. मेडिकलमध्ये त्याच्यावर मागील ११ दिवसांपासून उपचार सुरू होते व बुधवारी सकाळी त्याचा संघर्ष संपला. पोटचा गोळा गमाविल्यानंतर त्याच्या आईचा आक्रोश पाहून मेडिकलमधील डॉक्टर व कर्मचारीदेखील हळहळल्याचे चित्र होते.
गिरीश महादेवराव गोंडाणे (वय ३२, सावरडी, जि. अमरावती) असे निर्दयी बापाचे नाव आहे. अमरावती येथील प्रतीक्षा हिचा प्रेमविवाह जुलै २०२१ मध्ये आरोपी गिरीष सोबत झाला होता. मजुरीचे काम करणारा गिरीश प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. दरम्यान, प्रतीक्षा गरोदर असल्यामुळे ती अमरावतीच्या रुग्णालयात बाळंतपणासाठी गेली. तेथील डॉक्टरांनी तिला मेडिकलमध्ये रेफर केले. मेडिकलमध्ये २८ डिसेंबरला ती वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये भरती झाली. दोन दिवसांनी ३० डिसेंबरला तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर ३१ डिसेंबरला सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान आरोपी गिरीश मेडिकलमध्ये पोहोचला. त्याने प्रतीक्षा भरती असलेल्या वॉर्डात जाऊन तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने प्रतीक्षाजवळून दोन दिवसांचे बाळ हिसकावले आणि फरशीवर आपटून बाळाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षाने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी गिरीश तेथून फरार झाला. बाळाच्या डोक्याला यात मोठी जखम झाली होती व तेव्हापासून लहान बाळावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. बाळाला श्वास घेण्यातदेखील अडचण येत होती. निवासी डॉक्टर, परिचारिका बाळाकडे विशेष लक्ष देत होते. मात्र, अखेर बुधवारी सकाळी ११ वाजता बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुचेवार यांनी दिली.
सैतानी बापावर आता हत्येचा गुन्हा
प्रतीक्षाची आई जीवनकला यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिरीशविरोधात कलम ३०७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.