नागपूर : पहाटेचे ४ वाजले अन् नागपूरकरांचा उत्साह कस्तुरचंद पार्कच्या दिशेने धावायला सुरुवात झाली. ‘लाेकमत महामॅरेथाॅन’ सुरू व्हायला अद्याप वेळ हाेता; पण लाेकांची आतुरता क्षणाेक्षणी वाढत हाेती. पहाटे ५ वाजेपर्यंत शहराचे केंद्रबिंदू गर्दीने फुलून गेले हाेते. एकीकडे धावकांचा उत्साह शिगेला पाेहोचला हाेता तर त्यांना चिअर्स करायला आलेल्यांचा जाेश गगनाला भिडला हाेता. ढाेलताशा पथकाचा आवाज निनादला अन् धावक जाेशात सज्ज झाले. इकडे झुंबाची लय अन् डीजेच्या ध्वनीलहरींवर रनर्सचा वाॅर्म-अप सुरू झाला. दुसरीकडे संगीताच्या तालावर नागपूरकरांनी असाकाही जल्लाेष केला, की वाटले, ये नागपूरकर फिट है बाॅस, ‘खूब दाैडेगा पर... काेराेना के आगे झुकेगा नही साला...’
एखाद्या बंदिस्त माणसाची अनेक वर्षाने सुटका व्हावी अन् बाहेरचा माेकळा श्वास घेताना त्यांच्या उत्साहाला उधाण यावे, असा काहीसा अनुभव रविवारी नागपूरकरांनी घेतला. पहिली, दुसरी अन् तिसरी काेराेनाची लाट आता ओसरली. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले आहे आणि अशात नागपूरकरांना ‘लाेकमत महामॅरेथाॅन’च्या रूपाने जल्लाेष करण्याची संधी मिळाली, नव्हे नागपूरकर या क्षणाची वाटच पाहत हाेते. गेली काही महिने या क्षणांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती.
२१ किमी, १० किमी, ५ किमी, ३ किमी अशा गटवारीत असलेल्या या महामॅरेथॉनला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-४’ मध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी रविवारी उदंड प्रतिसाद दिला. एका भव्य व्यासपीठावर रिलॅक्स झिल टीमने सकाळी ५ वाजता टेक्निकल वॉर्म-अपला सुरुवात केली. चिरपरिचित अंदाजात युवावर्गाचे लाडके अँकर अमोल शेंडे व अनुजा घाडगे यांनी सहभागी स्पर्धकांमध्ये जोश भरण्यास सुरुवात केली. अखिल गजघाटे यांच्या नेतृत्वात रिलॅक्स झिलच्या टीमने रिमिक्सपासून भांगडापर्यंत सर्व गाण्यांवर हजारो धावपटू व्यायामाचे विविध प्रकार करवून घेतले.
मराठी, पंजाबी, हिंदी अशा सर्व प्रकारच्या गीतांनी सर्वांमध्ये नवऊर्जा निर्माण केली. स्पर्धेची वेळ जवळ आली तेव्हा सामूहिकरीत्या राष्ट्रगीत झाले. २१ किलाेमीटरचे सर्व धावपटू मुख्य कमानीसमोर सज्ज झाले. दहा ते शून्यपर्यंतचे आकडे उच्चारत बरोबर ६.१५ वाजताचा ठाेका वाजला अन् स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी आतषबाजी करण्यात आली. हजारो स्पर्धक धावत होते... ढोलताशांच्या निनादाने आसमंत दणाणून गेला होता... यानंतर १० कि.मी., ५. कि.मी. व ३ कि.मी.साठी वॉर्म-अप घेण्यात आले.
३ कि.मी. स्पर्धेत अनेक परिवार सहभागी झाले होते. आई-वडील त्यांचा मुलगा, मुुलगी सर्वजण एकसाथ धावण्यासाठी सज्ज होते. कुटुंबासह अनेकांनी पहिले वॉर्म-अप केले. सर्वांमध्ये खेळाडू भावना दिसून आली. अनेक मित्र- मैत्रिणी गटागटाने आले होते. वॉर्म-अपने नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना मैदान सोडताना खेळाडूंच्या चेहऱ्यांवर झळकत होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, स्पर्धा सुरू झाल्यानंतर व संपल्यानंतर तासभर सर्वांनी जोरदार नृत्य केले....धावणाऱ्या प्रत्येकानेच विजयाच्या आनंदात खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.