नागपूर - माध्यमांतील बातम्यांमध्ये विचारांचे दही किंवा लोणचं टाकल्यानंतर काय होईल. आज वर्तमानपत्र जे मनात येईल ते छापत आहेत, मग कुठल्या लोकशाहीची तुम्ही चर्चा करताय. काही वर्तमानपत्रांच्या पहिल्या लीड बातम्या अशा असतात, ज्यातून त्यांचे विचार स्पष्ट होतात. मग, ही बातमी कुठे आहे, ही विचारधारा आहे. या वर्तमानपत्रांनी ही विचारधारा म्हणून प्रोजेक्ट करायला हवं, असे परखड मत वरिष्ठ पत्रकार अंकुश श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
नागपूर इथं होत असलेल्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं. त्यामध्ये, देशातील वरिष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. येथे बोलताना श्रीवास्तव यांनी म्हटलं की, आजच्या काळात आणीबाणीचा काळ आठवण गरजेचं आहे. कारण, आजच्या चर्चेचा विषय आहे की, माध्यमाचं धुव्रीकरण झालंय का? याचाच अर्थ देशातील लोकशाही जिवंत आहे की नाही, असेही कोणीतरी म्हणू शकते. मात्र, परिस्थिती आज तशी नाही. आपण जो अनुभव घेतलाय, गेल्या ६० ते ७० वर्षात त्यात निश्चित बदल झालाय. आम्ही जेव्हा रेशनच्या दुकानात जात होतो, तेव्हा तो दुकानदारही भल्यामोठ्या रांगतून हाकलून देत होता. तिथं स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि इतरही लोकं गप्प बसत होते, तिथे पत्रकार तरी काय आवाज उठवणार?, असे म्हणत आज पत्रकारितेतून आवाज बुलंद झालाय, असे अकुश श्रीवास्तव यांनी म्हटले.
आम्ही पत्रकारितेचा तो काळ पाहिलाय, ज्यामध्ये महिनाभरातील ३० पैकी २५ दिवस केवळ पंतप्रधानांचंच भाषण असायचं. एक दिवस राष्ट्रपतींचं भाषण असायच आणि उरलेल्या इतर दिवशी दुर्घटना, अपघात किंवा काही बातम्या असायच्या. तेव्हा आजच्या सारखी पत्रकारिता नव्हती की, तुम्ही प्रश्न विचारत होतात?. बेरोजगारी, महागाईचे प्रश्न उपस्थित करत होतात. आज महागाई ०.२ टक्के वाढली तरी ती बातमी लीड होतेय, ९० च्या दशकानंतर मोठा बदल या क्षेत्रात झालाय. त्यानुसार, आज परखडपणे विरोधात लिहिलं जातंय, छापलं जातंय.