लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या पुढील कृषी क्रांती ही पशुधन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या नेतृत्वाखाली होईल, असा दावा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे ( कृषी विस्तार) विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ. के.डी. कोकाटे यांनी येथे केला.
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित १५ व्या विस्तार आणि निरंतर शिक्षण परिषदेच्या बैठकीला ते मार्गदर्शन करीत होते. माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ. एस.के. रॉय, वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ. व्ही. श्रीधर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, किरण महल्ले, रवींद्र मेटकर, महेश भोंडगे, माजीद खान रज्जाक पठाण, भागवत देवसरकर, राजू इंगळे, डॉ. राजेश जयपूरकर, माफसूचे शिक्षण व अधिष्ठाता संचालक डॉ. एस. व्ही. उपाध्ये आणि माफसुचे विस्तार शिक्षण संचालक आणि परिषदेचे सचिव डॉ. अ.उ. भिकाने प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. भिकाने यांनी विद्यापीठाच्या विस्तारित उपक्रमांचे सादरीकरण केले. घटक महाविद्यालयांच्या सहयोगी अधिष्ठातांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विस्तार उपक्रमांचा आढावा मांडण्यात आला आणि पुढील वर्षासाठीच्या कृती मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी येत्या वर्षभरात विद्यापीठाच्या विस्तारित उपक्रमांना अधिक बळकट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सहायक प्राध्यापक व तांत्रिक अधिकारी डॉ. सरिपुत लांडगे यांनी संचालन करीत आभार मानले.