नागपूर : विदर्भात पुढील आठवडाभर चांगला पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र एकसमान राहण्याची शक्यता कमी आहे. तशी स्थिती गुरुवारीही दिसून आली. अकाेला, खामगावात धुवाधार असलेला पाऊस इतरत्र रिमझिम हाेता आणि नागपूरकर मात्र काेरडे राहिले.
बुधवारी रात्रीपासून विदर्भातील अकाेला, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व अमरावतीच्या वरूड परिसरात पावसाने जाेरदार हजेरी लावली. अकाेला शहरात गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत १२५ मिमी पावसाची नाेंद झाली. जिल्ह्याच्या बार्शीटाकळी परिसरात ८ सेमी पाऊस झाला. दुसरीकडे खामगावात २४ तासात ९ सेमी पावसाची नाेंद झाली तर वरूडला ७ सेमी नाेंदविला गेला. इतर भागात रात्रभर रिपरिप चालली हाेती. त्यामुळे चंद्रपूरच्या जीवती येथे ३३.८ मिमी, यवतमाळच्या आर्णी येथे ५२.८ मिमी पाऊस झाला. गडचिराेली व वर्धा जिल्ह्यातही रिमझिम तुषार झाले. गुरुवारी दिवसभर मात्र पाऊस शांत हाेता. कुठेही नाेंद घेण्यासारखा पाऊस झाला नाही.
नागपुरात मात्र पावसाचा सारखा लपंडाव चालला आहे. बुधवारी दिवसभर आकाश काळ्या ढगांनी व्यापले असतानाही पावसाचा पत्ता नव्हता. रात्रीही नगण्यच हजेरी लागली. गुरुवारी तर सकाळी ऊन निघाले हाेते. दुपारनंतर ढगांची गर्दी जमली पण तुरळक थेंबाशिवाय जमिनीपर्यंत फार काही पाेहचले नाही. जिल्ह्यात नरखेड तालुक्यात रिमझिम सरी आल्या आणि कुही तालुक्यात ही हजेरी लागली. दरराेज काळे ढग दाटून येतात पण पावसाला जाेर काही चढत नाही, अशी अवस्था नागपूरकरांची आहे. गुरुवारी नागपुरात कमाल तापमानही ३.३ अंशाने वाढले व ३१.९ अंशाची नाेंद झाली. उकाडा नसला तरी गारवा वाटावा, असे वातावरण नव्हते. गाेंदिया, यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यातही पारा वाढलेला हाेता.