लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे आणि गारपिटीचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १६ आणि १७ फेब्रुवारीला वातावरणातील हा संभाव्य बदल लक्षात घेता, नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नागपूर हवामान प्रादेशिक कार्यालयाने कळविल्यानुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढचे ४८ तास अवकाळी पावसाचे राहणार आहेत. नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ तारखेला एक-दोन ठिकाणी विजांसह पाऊस येण्याची शक्यता आहे. परंतु १७ तारखेला या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी विजांसह गारपीट, पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषत: चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी गारपिटीचा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. हरभरा, कापूस, भाजीपाला पिके, संत्रा, मोसंबी, लिंबू या पिकांना नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीपासून पिके वाचविण्यासाठी नियोजन करावे, उघड्यावर असणारा शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि फळबागांमध्ये पावसाचे पाणी साचू देऊ नये, लगेच निचरा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पारा चढतोय
हवामान विभागाने वकाळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला असला तरी, विदर्भातील तापमानाचा पारा तीन दिवसापासून वाढ दर्शवीत आहे. नागपूर शहरात गेल्या २४ तासातील किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा येथेही तापमान १८ अंशावरच होते. मात्र गोंदियात सर्वात कमी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, चंद्रपुरात १७.२ तर गडचिरोलीत १७.४ अंशाची नोंद घेण्यात आली. वाशीममध्ये १६.२ किमान तापमान होते.
...