मोरेश्वर मानापुरे
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) नेहमीच महामार्ग आणि पुलांचे बांधकाम करताना पाहिले आहे. पण आता एनएचएआय डोळ्यांच्या रुग्णालयाची उभारणी करीत आहे. ४० खाटांच्या या रुग्णालयाचे बांधकाम मानकापूर येथील जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात येणार आहे.इंदोरा चौक ते दिघोरीपर्यंत बनणाऱ्या उड्डाणपूलाला (८.९० किमी) डागा हॉस्पिटलजवळ पूलावरून प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी जोड रस्ता देण्यात येणार आहे. याकरिता डागा हॉस्पिटलची जागा अधिग्रहित करण्यात येईल. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, डागाच्या जमिनीच्या मोबदल्यात एनएचएआय मानकापूर येथील निर्माणाधीन जिल्हा रुग्णालय परिसरात डोळ्यांच्या रुग्णालयाची उभारणी करणार आहे.
११ वर्षांनंतरही जिल्हा रुग्णालय तयार नाही
उपराजधानीत जिल्हा रुग्णालय बनविण्याची तयारी २०१२-१३ पासून सुरू आहे. त्यावेळी केवळ प्रस्ताव करण्यात आला होता. या प्रस्तावाला २०१६ मध्ये मंजूरी मिळाली. त्यानंतर १६ कोटींच्या गुंतवणुकीतून १०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम २ मे २०१८ पासून सुरू झाले. हे काम २४ महिन्यात पूर्ण होणार होते. पाच वर्षांनंतरही काम अपूर्ण आहे. कोरोनाकाळात मैदान आणि रेल्वेमध्ये अस्थायी रुग्णालय बनविण्याची स्थिती आली होती. त्यानंतरही आता सुसज्ज रुग्णालयाच्या उभारणीला प्राधान्य दिले जात नाही, ही शोकांतिका आहे. जिल्हा रुग्णालयासंदर्भात डॉ. निवृत्ती राठोड यांना विचारणा केली असता ते अचानक एका महत्त्वाचा बैठकीला गेल्याने माहिती देऊ शकले नाहीत.
निधी उपलब्ध नाहीच
जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीत आधी फायर सेफ्टी, मॉड्युलर ओटी, रँप, शवविच्छेदनगृह आदींचा सहभाग नव्हता. आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ४४ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. जुने ३ कोटी रुपये आतापर्यंत मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काम थांबले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ १० ते १५ झोपड्यांचे अतिक्रमण असून त्या पाच वर्षांपासून हटविण्यात आलेल्या नाहीत. त्याच कारणांनी अजूनही सुरक्षा भिंत उभी राहू शकली नाही. रुग्णालयाचे बांधकाम हास्यास्पद ठरले आहे.
दूरदृष्टीचा अभाव२०१२ नुसार येथे १०० खाटांच्या रुग्णालयासाठी जी प्लस-२ इमारत बनविण्यात येत आहे. या इमारतीचे पिल्लर जास्त मजली इमारतीसाठी नाहीत. त्यामुळे भविष्यात या इमारतीवर जास्त मजले बांधता येणार नाहीत. सध्या अतिरिक्त ४०० खाटांचा प्रस्ताव सरकारकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. अतिरिक्त खाटांसाठी परिसरात दुसऱ्या ठिकाणी इमारत बांधावी लागेल. आरोग्यासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीची गती संथ असल्याने सरकारी काम दिशाहीन पद्धतीने चालढकल करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्याचा फायदा परिसरातील खासगी रुग्णालयांना मिळत आहे.