केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, खटला मुंबईला स्थानांतरणाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:14 PM2023-08-05T12:14:00+5:302023-08-05T12:16:09+5:30
नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीची हायकोर्टात धाव
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शंभर कोटी रुपयांची खंडणी मागणे आणि ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाचा न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित केला जावा, यासाठी नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व मुख्य आरोपी जयेश पुजारी यांना नोटीस बजावून यावर ३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अपीलवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
या प्रकरणात धंतोली पोलिसांनी भादंवि कलम ३८५, ३८७, ५०६(२) व ५०७ अंतर्गत दोन एफआयआर नोंदविले आहेत. त्यापैकी पहिल्या गुन्ह्यांतर्गत नागपूरमधील एनआयए कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह विभागाने १२ जुलै २०२३ रोजी आदेश जारी करून ‘एनआयए’ला पहिल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे ‘एनआयए’ने १३ जुलै रोजी मुंबईतील एनआयए पोलिस ठाण्यात भादंवितील कलम ३८५, ३८७, ५०६(२) व ५०७ आणि बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यातील कलम १०, १३, १८ व २० अंतर्गत सुधारित प्रकरण दाखल केले. तसेच, १४ जुलै रोजी मुंबईमधीलच एनआयए कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर ‘एनआयए’ने १५ जुलै रोजी नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून येथील खटल्याचा न्यायिक रेकॉर्ड मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी केली. तसेच, धंतोली पोलिसांकडील रेकॉर्डही मागितला.
१८ जुलै रोजी नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयाने न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याची मागणी नामंजूर केली. त्याविरुद्ध, ‘एनआयए’ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा वादग्रस्त निर्णय रद्द करून येथील खटल्याचा न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याचे निर्देश द्या, अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. ‘एनआयए’तर्फे ॲड. संदीप सदावर्ते तर, केंद्र सरकारतर्फे ॲड. नंदेश देशपांडे व ॲड. चरण ढुमणे यांनी कामकाज पाहिले.
आरोपीने दोनदा धमकीचे फोन केले
या प्रकरणात धंतोली पोलिसांनी आरोपी जयेश उर्फ शाहीर उर्फ शाकीर शशिकांत पुजारी आणि अफसर पाशा बशीरउद्दीन नूर मोहम्मद यांना अटक केली आहे. कर्नाटक येथील बेळगाव कारागृहात असताना पुजारीने १४ जानेवारी व २१ मार्च २०२३ रोजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून पहिल्यावेळी १०० कोटी तर, दुसऱ्यावेळी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच, खंडणी दिली नाही तर, गडकरी यांना बॉम्बस्फोट करून ठार मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी पुजारीला ३ एप्रिल रोजी अटक करून नागपूरला आणले. तपासादरम्यान, पुजारीने अफसर पाशाच्या सांगण्यावरून संबंधित फोन केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी १५ जुलै रोजी पाशालाही बेळगाव कारागृहात अटक करून नागपूरला आणले. पुजारी केरळमधील कायमागुलम, ता. मावेरीकर, जि. अल्लापुरा येथील रहिवासी आहे.