रेल्वेगाड्यांची गती वाढेल : लवकरच कामाचा शुभारंभनागपूर : नागपूर-सेवाग्राम चौथ्या लाईनची घोषणा २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात केल्यानंतर आता नीती आयोग आणि रेल्वेमंत्र्यांनी या कामाला मंजुरी दिली असून, चौथी लाईन सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या मार्गावर आणखी एक लाईन उपलब्ध होऊन रेल्वेगाड्यांची गती वाढण्यास मदत होणार आहे.नागपूर-सेवाग्राम मार्गावर सध्या अप आणि डाऊन अशा दोन लाईन सुरू आहेत. या मार्गाची रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता १०० असताना, या मार्गावर १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे तिसऱ्या लाईनचे काम प्रगतिपथावर होते. २०१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ६३८ कोटी रुपये किमतीच्या चौथ्या लाईनची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यास नीती आयोगाची मंजुरी मिळालेली नव्हती. नीती आयोगाने या कामाला मंजुरी दिल्यामुळे या कामावर आता पैसे खर्च करता येणे शक्य झाले आहे. ७८.८७ किलोमीटर लांबीचा मार्ग आता पूर्ण होण्यात कोणताही अडसर नाही. या मार्गावर एकूण १४७ पूल बांधण्यात येणार आहेत. त्यात दोन अति महत्त्वाचे, १२ मुख्य, १३३ इतर पुलांचा समावेश आहे. चौथी लाईन पूर्ण झाल्यानंतर या सेक्शनमध्ये रेल्वेगाड्यांची गती वाढून नागपूरला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)
नागपूर-सेवाग्राम ‘फोर्थ लाईन’ला नीती आयोगाची मंजुरी
By admin | Published: April 14, 2017 3:05 AM