लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लंडनमध्ये नोकरी देण्याच्या भूलथापा देऊन ४१.७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या सदस्यांनी अनेक वर्षांपासून सायबर फसवणुकीचा रोजगार म्हणून अवलंब केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी देश-विदेशातील लोकांना फसवून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. या टोळीच्या कारनाम्याची माहिती घेण्यासाठी आरोपींना पोलिसांनी १९ ऑक्टोबरपर्यंत ताब्यात घेतले आहे.
लोकमतने मंगळवारीच या प्रकरणाला उजेडात आणले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी मंगळवारी पत्रकारांना याची माहिती दिली.
सैन्य दलातील नर्सिंग शाखेतून निवृत्त महिलेला लंडनमध्ये मोठे पॅकेजवर नोकरी देण्याची बतावणी करून जुलै महिन्यात फसवणूक केली होती, हे प्रकरण सर्वांना माहीत आहे. या घटनेनंतर महिला तणावात होती. पती आणि मुलाने विचारपूस केल्यानंतर तिने खरी घटना सांगितली. त्यानंतर गिट्टीखदान ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी बँक खात्याच्या आधारावर दिल्लीत धाड टाकून सुजित दिलीप तिवारी (२५) पटेलनगर, द्वारका आणि चार नायजेरियन नागरिकांना अटक केली होती. पूर्वी सुजितचे मोबाईलचे दुकान होते. आता तो फिरून मोबाईल विकतो. कमाईच्या लालसेने तो या टोळीशी जुळला. त्याने बोगस कंपनी बनवून बँकेत खाते उघडले. नायजेरियन आरोपींकडे आठ बँक खाती आहेत. ती वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. त्यामध्ये पीडित लोकांची रक्कम जमा व्हायची. या खात्यातील रक्कम सुजितच्या खात्यात वळती व्हायची. सुजित रक्कम काढून नायजेरियन आरोपींना सोपवायचा.
सुजित ५ ते १० टक्के कमिशन घेऊन ही उर्वरित रोख रक्कम नायजेरियन आरोपींना द्यायचा. बँक खात्याच्या आधारावर पोलिसांनी प्रारंभी सुजितला ताब्यात घेतले. त्याच्या इशाऱ्यावरून दिल्ली पोलिसांच्या मदतीने नायजेरियन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांना सुजितच्या पाच बँक खात्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये २.५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाला आहे. अन्य खात्याची माहिती मिळाल्यानंतर ही रक्कम जास्त असू शकते.
नायजेरियन नागरिक मोठ्या संख्येने सायबर फसवणुकीत जुळले आहेत. ते सुजितसारख्या लोकांचा उपयोग केवळ बँक खात्यासाठी करतात. दिल्लीच्या मोहन गार्डन परिसरात पाच ते सहा नायजेरियनबहुल वस्त्या आहेत. तेथूनच ते फसवणुकीचा उद्योग करतात. देशाच्या राजधानीत अशा प्रकारची संघटित गुन्हेगारी होण्याची बाब आश्चर्यकारक आहे. आरोपी १९ ऑक्टोबरपर्यंत सायबर सेलच्या ताब्यात असून विचारपूसमध्ये नवीन माहिती मिळण्याची काहीच अपेक्षा नाही.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनात पीआय अशोक बागुल, राघवेंद्र सिंह क्षीरसागर, एपीआय विशाल माने, कर्मचारी संजय तिवारी, राहुल धोटे, अजय पवार, दीपक चव्हाण आणि बबलू ठाकूर यांनी केली.