लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषित केलेल्या नाईट कर्फ्यूला उपराजधानीत आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ऑपरेशन ऑल आऊटचे निर्देश दिल्यामुळे रात्री ११ वाजतापासून पोलीस शिपायापासून तो पोलीस आयुक्तांपर्यंत (पीसी टू सीपी) सर्वच नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात आजपासून महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरात पहिल्या दिवसापासूनच कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सायंकाळपर्यंत प्रदीर्घ बैठक घेऊन बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. रात्री ११ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही आस्थापने सुरू राहणार नाही, यासंबंधीचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
---
शहराच्या सीमांवर कडक तपासणी
बाहेरगावच्या सीमांवर शहर पोलिसांची बॅरिकेड आणि नाकेबंदी राहील. याशिवाय रात्री ११ नंतर हॉटेल, पानटपरी किंवा अत्यावश्यक सेवा वगळता कुठेही काही सुरू दिसले तर पोलीस कारवाई करतील. वाहनांची तपासणी आणि संशयितांची झाडाझडती घेतली जाईल.
---
पोलीस आयुक्तांचे आवाहन
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणामुळे किंवा वैद्यकीय कारणामुळेच घराबाहेर पडावे. सोबत ओळखपत्र ठेवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतच्या माध्यमातून नागपूरकरांना केले आहे.
---