पहिलाच प्रयोग : पर्यटकांना संपूर्ण रात्र जंगलात घालविण्याची संधीनागपूर : वन विभागाच्यावतीने वन पर्यटनातून वनसंरक्षणाला चालना मिळावी, या हेतूने पेंच व्याघ्र प्रकल्पाशेजारच्या नागलवाडी व पवनी (वन्यजीव) या वन परिक्षेत्रात पर्यटकांसाठी रात्र गस्ती, पायदळ गस्ती व मचाण गस्ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा वन विभागाचा पहिलाच प्रयोग असून, तो प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात आहे. यासंबंधी वन विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार पर्यटकांना या गस्तीत सहभागी होण्यासाठी किमान चार दिवस आधी मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे कार्यालयातील सहायक वनसंरक्षक (अवैध शिकार प्रतिबंधक कक्ष) यांच्याकडे नोंद करणे आवश्यक आहे. यात प्रत्येक दिवशी तीन वाहनांना जंगलात प्रवेश दिला जाईल. यानंतर रात्री ७.३० ते १२ वाजतापर्यंत आणि पहाटे ४ ते सकाळी ६.३० वाजतापर्यंत गस्त करता येईल. यामध्ये वन्यजीव क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. या रात्र गस्तीसाठी पर्यटकांना एक हजार रुपये प्रति वाहन शुल्क द्यावे लागेल. त्यापैकी ३०० रुपये गाईड शुल्क, १०० रुपये रात्र भत्ता व उर्वरित ५० टक्के रक्कम ही ग्राम परिस्थितीकीय समिती आणि ५० टक्के रक्कम पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पर्यटकांना या गस्तीदरम्यान सर्च लाईट, कॅमेरा, मोबाईल, मद्य, सिगारेट, तंबाखू, गुटखा किंवा खर्रा जंगलात घेऊन जाता येणार नाही. शिवाय रात्र गस्तीवरून परत आल्यानंतर परिक्षेत्र कार्यालयात असलेल्या गस्ती नोंदवहीवर गस्तीदरम्यान आलेल्या निरीक्षणाबाबत माहिती भरणे अनिवार्य राहणार आहे. (प्रतिनिधी) मचाण गस्ती उन्हाळ्यात पर्यटकांचा जंगलाकडे अधिक ओढा वाढतो. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या तीन दिवस अगोदर व तीन दिवस नंतर विशेष मचाण गस्त सुरू केली आहे. ही गस्त महिन्यातून सात दिवस चालणार आहे. यात मचाणवरील गस्तीकरिता जास्तीतजास्त दोन व्यक्तींना परवानगी दिली जात आहे. शिवाय प्रत्येक मचाणकरिता एक पर्यटक मार्गदर्शकसुद्धा अनिवार्य आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक पर्यटक चमूकरिता एक हजार रुपये आकारले जातात. यात मचाणवर बसण्याची वेळ ही सायंकाळी ५ ते सकाळी ६ वाजतापर्यंत निश्चित केली आहे.
पेंचमध्ये पर्यटकांसाठी रात्र गस्ती!
By admin | Published: February 21, 2016 2:44 AM