नागपूर : दिवसरात्रीचे तापमान चढउतार बघायला मिळत आहे. रविवारी किमान तापमानात अनपेक्षितपणे २ अंशाची वाढ झाली हाेती, मात्र साेमवारी त्यात पुन्हा २.८ अंशाची घसरण हाेत रात्रीचा पारा १७.६ अंशावर गेला. पारा घसरल्याने रात्री अधिक गारवा जाणवायला लागला आहे.
ऑक्टाेबर हीटचा सामना करणाऱ्या नागपूरसह विदर्भातील नागरिकांना लवकर थंडी सुरू हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र नाेव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असताना थंडीची हवी तशी जाणीव हाेत नसल्याने लाेकांची चिंता वाढली हाेती. हवामान विभागाने १५ नाेव्हेंबरपर्यंत थंडीचा जाेर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार हळूहळू पारा घसरत चालला आहे.
पंजाब, हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतातील काही प्रदेशात पारा घसरून धुके दाटायला लागले आहेत. दुसरीकडे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या दक्षिणकेडील राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या दाेन भागातील वातावरणाचा प्रभाव मध्य भारतात दिसून येत आहे. मात्र यापुढे थंडीत वाढ हाेईल, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.
विदर्भात भंडाऱ्यात सर्वाधिक २२ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. दुसरीकडे शेजारचे गाेंदिया शहर सर्वात थंड ठरले. येथे सर्वात कमी १६.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली आहे. चंद्रपूर व गडचिराेली १७ अंशावर आहेत. नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यात कमाल तापमान सरासरीत आले असल्याने उन्हाची व उकाड्याची जाणीव कमी व्हायला लागली आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जाेर हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.