लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नीट’चा निकाल शुक्रवारी सायंकाळनंतर जाहीर झाला. विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या निकालांमध्ये नागपुरातील स्मित वाळके या विद्यार्थ्याने ६८५ गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. अखिल भारतीय पातळीवर त्याचा ४७० वा क्रमांक आहे. दरम्यान, नागपुरातील विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षेनुरुप राहिला नसल्याचे चित्र दिसून आले.
१३ सप्टेंबर रोजी शहरातील ६४ परीक्षा केंद्रांवर पेन अॅन्ड पेपर बेस परीक्षा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे ‘कोरोना’च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रकोप कायम असल्याने विद्यार्थी व पालकांवर दुहेरी ताण होता. मात्र अखेर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मानसी श्रीराव (६८१) तर तिसऱ्या क्रमांकावर सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी अक्षत गुप्ता (६७७) हा आहे. यासोबतच सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजचीच विद्यार्थिनी जान्हवी चौधरी (६७१ गुण), चैत्र कसोड (६७१), क्षितिज रंगारी (६७०), उत्कर्ष हजारे (६४७) यांनीदेखील उल्लेखनीय कामगिरी केली.
‘एनटीए’ने केलेल्या घोषणेनुसार शुक्रवारी दुपारीच निकाल येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात निकाल सायंकाळी ५च्या सुमारास घोषित झाले व त्यानंतर संकेतस्थळ संथ झाले. ‘सर्व्हर’वर जास्त भार आल्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली.