नरेश डोंगरे
नागपूर : तो अत्यंत घाणेरड्या शिव्या देतो. रस्त्यावर अपमानित करून मारहाणही करतो. त्यामुळे प्रचंड वैफल्य आले आहे. काय करावे काही कळत नाही, असे बोलून निकिता चाैधरीने तिची वैफल्यग्रस्तता मित्र-मैत्रिणींसमोर मांडली होती. मात्र, सहापैकी एकाही मित्र-मैत्रिणीने तिची व्यथा समजून घेतली नाही किंवा तिला धीर दिला नाही. त्यामुळेच निकिताचा जीव गेला.
असे आहे प्रकरण
निकिता लखन चाैधरी (२२) या प्रतापनगरातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी आढळून आला होता. ती मंगळवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात दिली होती.
निकीताचे रहस्यमय मृत्यू प्रकरण उपराजधानीत चर्चेचा वणवा पेटविणारे ठरले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील रहस्य उलगडून काढावे आणि आरोपीला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी रविवारी रात्री मोठा कॅन्डल मार्च प्रतापनगर ठाण्यावर धडकला. निकितासोबत कुकर्म करून नंतर तिला जाळून ठार मारल्याचा आरोप यावेळी निकिताची आई, भाऊ आणि नातेवाईकांनी पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांना तक्रार देऊन केला. तर, पुढच्या काही तासात निकिताचा बळी घेणाऱ्याला अटक केली नाही तर तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा मार्चचे नेतृत्व करणाऱ्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता भडका उडवू शकते. ते लक्षात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची शोधमोहिम अधिकच तीव्र केली. कारवाईचे स्वरूप ठरविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज प्रदीर्घ बैठक घेऊन आतापर्यंत हाती आलेल्या तपासाच्या अहवालावर पुन्हा एकदा विचारमंथन केले आहे. यासंबंधाने ‘लोकमत’नेही संबंधित सूत्रांकडून आतापर्यंतच्या तपासात काय पुरावे हाती लागले, त्याचा कानोसा घेतला. त्यानुसार, निकिता तिच्या एका मित्राकडून प्रचंड मानसिक यातना सहन करीत होती, असे पुढे आले आहे.
काही तासांपूर्वीच व्हाॅट्सॲपवर टाकल्या वेदना
निकिताच्या तीन मैत्रिणी अन् मित्र असा सहा जणांचा ग्रुप होता. ते मोबाईलवर रोज एकमेकांना ‘दैनंदिनी’ शेअर करायचे. घटनेच्या एक दिवसापूर्वी निकिताने आपल्या मैत्रिणीला व्यथा व्हॉट्सॲपवर व्यथा सांगितली. ‘बीएफ’ खूप टॉर्चर करतो. चांगला वागतच नाही. अत्यंत घाणेरड्या शिव्या देतो. रस्त्यावर अडवतो. मारहाणही करतो. संशय घेतो. त्याचे वर्तन फारच वेदनादायी आहे, असे म्हटले. काय करावे समजत नाही, अशी हतबलताही बोलून दाखविली. त्यावर एका मैत्रिणीने तिला ‘मी त्याच्याशी बोलू का’, अशी निकिताला विचारणा केली. मात्र, निकिताला कुणीच भक्कम मानसिक आधार दिला नाही किंवा तिचे समुपदेशनही केले नाही.
डॉक्टरांमुळे वाढली पोलिसांची डोकेदुखी
मंगळवारी सायंकाळपासून निकिता गायब झाली. बुधवारी तिचा जळालेला मृतदेह वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला. तिचा मृत्यू जळाल्याने (बर्न शॉक) झाल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात नमूद केले. मात्र, तिच्या शरीरावर मारहाणीची कुठलीही जखम नसल्याचे म्हटले आहे. तिच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाला की नाही, ते डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात स्पष्ट केले नाही. त्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत अन् पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पोलिसांचा तपास अन् अंदाज
निकिताची हत्या की आत्महत्या याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी निकिताशी संबंधित मित्र-मैत्रिणींकडे चाैकशी केली. ज्याच्याकडून मानसिक त्रास होत होता, त्याचेही सर्व कॉल डिटेल्स, घटनेच्या दोन दिवसापूर्वीपासून तो आजपर्यंतच्या हालचाली रेकॉर्डवर घेतल्या. निकिता ज्या ऑटोत बसून सुराबर्डी-वाडीच्या घटनास्थळांकडे गेली. तो ऑटो अन् चालकही हुडकला. त्याचीही चौकशी केली. त्या मार्गावरचे बहुतांश सीसीटीव्हीही तपासले. यात निकिता एकटीच असल्याचे दिसून येत आहे. ज्या मित्राला निकिताने डिझेल आणायला सांगितले. त्याचीही चाैकशी केली. निकिताच्या मोबाईलचा सीडीआर, सोशल प्लॅटफॉर्मवरील चॅट आदी सर्वच मिळविले. या सर्व तपासातून निकिताने स्वत:वर डिझेल ओतून पेटवून घेतल्याचा अंदाज निघत आहे. त्यामुळे अपहरण, बलात्कार, हत्येसारख्या प्रकरणात कुण्या निरपराधाला अटक कशी करावी, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.