नागपूर: पाच दिवसांपूर्वी सुराबर्डी परिसरातील निर्जन ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या निकिता लखन चाैधरी (वय २२) या तरुणीचे मृत्यू प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त जमावाने रविवारी रात्री ज्वाला जांबूवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात कँडल मार्च काढून प्रतापनगर ठाण्याला घेराव घातला.
निकिता खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होती. मंगळवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या निकिताचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सुराबर्डी परिसरात बुधवारी सायंकाळी आढळला होता. बाजुलाच पेट्रोलची रिकामी बाटली पडून होती. एकूण घटनाक्रमावरून निकिताची हत्या केल्यानंतर तिला जाळले असावे, असा संशय होता. या प्रकरणाची वाडी ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी अद्याप हत्या की आत्महत्या, असा ठोस निष्कर्ष पोलिसांनी काढला नाही. दुसरीकडे निकिताची हत्याच केल्याचा संशय तिच्या आप्तस्वकियांना आहे. त्यामुळे हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी त्यांची भावना आहे. पाच दिवस झाले तरी पोलिसांकडून तसा गुन्हा दाखल न झाल्याने निकिताच्या आप्तांचा आक्रोश वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी निकिताच्या राणाप्रतापनगरातील घरी शेकडो संतप्त लोक जमले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या ज्वाला धोटे यांनी निकिताच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून तेथून मोठा कॅण्डल मार्च काढला. निकिताला न्याय द्या, अशी घोषणाबाजी करीत शेकडोंचा जमाव प्रतापनगर ठाण्यावर धडकला. ठाण्याला त्यांनी घेराव घातला. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त लोहित मतानी तेथे पोहचले. ज्वाला धोटे तसेच निकिताचे मोठे बंधू आकाश चाैधरी यांनी उपायुक्त मतानी यांना तक्रारवजा निवेदन दिले. निकिताचे अपहरण करून तिच्यासोबत कुकर्म करण्यात आले, नंतर तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केल्याचे या तक्रारीत नमूद होते. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी उपायुक्त मतानी यांनी दिले.
तर तीव्र जनआंदोलन... -या प्रकरणात आता जनआक्रोश वाढला आहे. तो लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा. आरोपींना हुडकून काढावे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,अशा ईशारा यावेळी ज्वाला धोटे यांनी दिला. दरम्यान, कॅण्डल मार्चमध्ये महिला, युवती, तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतल्याने पोलिसांनी प्रतापनगरात तात्काळ अतिरिक्त बंदोबस्त लावला होता.