नागपूर महानगरपालिकेत नायलॉन मांजाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:01 PM2018-01-11T23:01:50+5:302018-01-11T23:04:59+5:30
नायलॉन मांजाच्या विरोधात गुरुवारी युवक काँग्रेसने आगळेवेगळे आंदोलन केले. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर पतंग उडवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉन मांजाच्या विरोधात गुरुवारी युवक काँग्रेसने आगळेवेगळे आंदोलन केले. नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील हिरवळीवर पतंग उडवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.
नगरसेवक बंटी शेळके म्हणाले, नायलॉन मांजाचा विषय गंभीर होत चालला आहे. नायलॉन मांजामुळे प्राणी, पक्षी तर मरतात पण अनेक जण मृत्युमुखी सुद्धा पडतात. कित्येकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. याला जबाबदार कोण? राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतर ही नागपूरच्या बाजारात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. ही गंभीर बाब आहे याला नागपूर महानगरपालिकाच जबाबदार आहे कारण मांजा तुटल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मांजामुळेही कित्येकांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. होत आहेत. शहरातील विविध बाजारपेठेत नायलॉन मांजाची विक्री होत आहे. याची कल्पना नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बंदीनंतरही मांजा उपलब्ध होणे हे प्रशासनाचे अपयश आहे. यावर तातडीने कारवाई व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
बसपाचे गट नेते नगरसेवक मोहम्मद जमाल, दीपक गजभिये, सुनील जाधव, अविनाश डेलीकर, तेजस जिचकार यांच्यासह सुशांत सहारे, रिजवान रुमवी, अक्षय घाटोळे, फजलूर कुरेशी, राजेंद्र ठाकरे, राज बोकडे, विक्टोरिया फ्रांसिस, शालिनी सरोदे, सुनील ठाकूर, अखिलेश राजन, संदीप बक्कसरे, चैतन्य मण्डलवार, निखिल बालकोटे, निखिल वांढरे, प्रफुल इजनकर, शेख अशफाक अली, नितीन गुरव, शानू राऊत, हेमंत कातुरे, स्वप्निल बावनकर, विजय मिश्रा, मयूर चिंचोडे, शेख शाकिब, मुजीब अहमद, मयूर माने, अतुल मेश्राम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.
मनपा आयुक्तांनी दिले कारवाईचे आश्वासन
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनानंतर मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांना निवेदन सादर करीत नायलॉन मांजाबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत मनपा आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. विभागातर्फे पथक नेमून कोणत्या विक्रेत्याकडे नायलॉन मांजा आहे, यांची कल्पना पोलिसांना देऊ असे सांगितले. यावेळी बंटी शेळके यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कार्यकाळात शहरातील मुख्यमार्गावरील व पुलावर तार बांधण्यात आले होते. त्यामुळे मांजा रस्त्यावर न पडता तारावरून जात होता व नागरिकांचा गळा सुरक्षित राहत होता, असे उपाय करता येईल, अशी विनंती केली. यावर मनपा आयुक्तांनी यासंबंधात याग्य पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.
जनजागृती मोहीम राबवणार
दरम्यान नगरसेवक बंटी शेळके यांनी सांगितले की, युवक काँग्रेसतर्फे शहरात नायलॉन मांजाबाबत जनजागृती राबवण्यात येईल. शहरात फेरी काढून दुकानदारांना व नागरिकांना चायना बनावटीच्या मांजावर बहिष्कार टाकावा. त्यामुळे कोणालाही ईजा पोहोचणार नाही, असे आवाहन केले जाईल, असे सांगितले.