लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंतीनिमित्त तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते ८१ बालकांना श्रामणेरची दीक्षा दिली.
दीक्षाभूमीच्या प्रांगणात लहान लहान बालक डोक्यावरचे केस काढून पालकांसह उपस्थित झाले. श्रामणेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व बालक रांगेनी बसले. त्यांच्या पाठीमागे पालक बसले होते. सुरुवातीला भदंत ससाई यांनी उपस्थित बालकांना श्रामणेर प्रतिज्ञा दिली. यावेळी पालकांचा आशिर्वाद घेतल्यानंतर बालकांनी भिक्खुचेही आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर त्रिशरणासह दशशील भदन्त ससाई यांच्याकडून ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत त्यांनी घेतले. यावेळी ससाई यांनी श्रामणेरांना चिवरचे महत्व सांगितले. यावेळी त्यांचे नामकरणही करण्यात आले. काशाय वस्त्रधारी श्रामणेर सोहळा ‘बुद्धं सरणं गच्छामि’च्या स्वरात निनादला. उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीत श्रामणेरांना निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या शिबिरादरम्यान भिक्खू संघ सात दिवस बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी मार्गदर्शन करतील.
याप्रसंगी भदन्त थेरो धम्मसारथी, नागसेन, धम्मविजय, भीमा बोधी, नागवंश, अश्वजित, भिक्खुनी संघप्रिया, धम्मप्रिया, कीसा गौतमी उपस्थित होत्या. समता सैनिक दलाचे विश्वास पाटील, राजू सुखदेवे, अॅड. स्मिता कांबळे, राजेश लांजेवार, धीरज सहारे, राजू झोडापे, राजश्री ढवळे, नंदकिशोर रंगारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मसेनेचे रवी मेंढे यांच्यासह भिक्खू, भिक्खुनी, उपासक उपासिकांनी सहकार्य केले.
आज बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रमशनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रबुद्ध बागडे आणि त्यांच्या गायक-कलावंतांतर्फे प्रबुद्ध हो मानवा हा बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रम सादर करतील. यासोबतच अंगुलीमाल, आम्रपाली लघुनाट्य आणि भीम गर्जन नृत्य सादर करतील.