लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीवर अद्यापही ‘कोरोना’चे संकट कायम असून रुग्णांची संख्या घटलेली नाही. मार्च महिन्यापासून सरकारसह अनेक खासगी इस्पितळांतदेखील ‘कोरोना’च्या रुग्णांचा उपचार झाला. नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात ‘कोरोना’मुळेच तब्बल सव्वातीन लाख मेट्रिक टन जैविक कचरा निर्माण झाला. एकूण वैद्यकीय कचऱ्याच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक होते. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेला विचारणा केली होती. मार्च ते नोव्हेंबर-२०२० या कालावधीत नागपुरात किती जैविक कचरा निघाला, त्यातील ‘कोरोना’मुळे निघालेल्या कचऱ्याचे प्रमाण किती होते, कचरा कुठे साठविण्यात आला, किती इस्पितळांना कचऱ्यांशी संबंधित नियम न पाळल्याने दंड झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात नागपूर शहरात ३ लाख २७ हजार ५७१ मेट्रिक टन जैविक कचरा उचलण्यात आला. दर महिन्याची सरासरी काढली तर हे प्रमाण ३६ हजार ३९६ मेट्रिक टन इतके होते. हा सर्व कचरा प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भांडेवाडी येथे जाळण्यात आला.
तीन वर्षांच्या तुलनेत वाढला कचरा
२०१८ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत शहरात ‘कोरोना’चा कचरा वगळता एकूण ७ लाख ६२ हजार १९० मेट्रिक टन वैद्यकीय कचरा गोळा करण्यात आला. प्रति महिना ही सरासरी २१ हजार ७७६ मेट्रिक टन इतका होतो. या तुलनेत ‘कोरोना’चा नऊ महिन्यातील कचरा प्रतिमहिना ३६ हजार ३९६ मेट्रिक टन इतका होता. वैद्यकीय कचऱ्याच्या तुलनेत ‘कोरोना’ कचऱ्याचे प्रमाण हे ६७ टक्क्यांनी अधिक होते.
नियमभंग करणाऱ्यांना १० लाखांचा दंड
‘कोरोना’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता कचरा फेकणाऱ्या एकूण ६३ व्यक्ती व इस्पितळांविरोधात मनपातर्फे कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दृष्टिक्षेपात जैविक कचरा
‘कोरोना’ वगळता वैद्यकीय कचरा (२०१८ ते नोव्हेंबर २०२०) - ७,६२,१९०.२८५ मेट्रिक टन
‘कोरोना’चा जैविक कचरा - ३,२७,५७१.८२ मेट्रिक टन