नागपूर : पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढून तलवारी दाखवत दुचाकीवर फिरणे तरुणांना महागात पडले. छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त तलवारी घेऊन फिरणाऱ्या नऊ तरुणांना तहसील पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. यानिमित्त हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने पारडीच्या रामभूमी सोसायटीतून रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील अनेक भागात ७० ते ८० युवक सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी काही तरुण काठ्या, तलवारी घेऊन घोषणा देत होते. हे करत असताना त्यांनी व्हिडीओ क्लिपिंगही बनवली. ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.
ही रॅली मोमीनपुरामार्गे महाल येथील गांधी गेट येथील शिवाजी पुतळ्याजवळ संपली. रॅलीतील तरुण तलवारी फिरवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशीची सूत्रे हलविली. पोलिसांनी व्हिडीओची तपासणी केली असता, तरुणांनी परवानगी न घेता रॅली काढल्याचे आढळून आले. या रॅलीत अनिकेत पंचबुधे, आशिष अंबुले, आदित्य सिंगनजुडे, राकेश साहू, कुंदन तायडे, रजत अंबोली, योगेंद्र बागडे, अर्पण गोळपे, सुमित तांबे, नचिकेत कुचेकर आदींनी प्रामुख्याने सहभाग घेतला. पोलिसांनी नचिकेत वगळता सर्वांना ताब्यात घेतले. आदित्य आणि राकेश हे डीजे ऑपरेटर आहेत. कुंदन, रजत, योगेंद्र आणि अर्पण यांनी तलवारी फिरवल्या. आरोपींविरुद्ध तहसील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचीदेखील हलगर्जी; माहितीच नव्हती
या घटनेनंतर सर्व ठाणेदारांना रॅली आणि इतर कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावरून स्थानिक पोलिसांचा हलगर्जी समोर आला आहे. त्याला या घटनेची माहिती लगेच मिळू शकली नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पावले उचलली.