सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघातांपैकी साधारण ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या आठ महिन्यात राज्यात २६,६०५ रस्ते अपघात झाले. यात ९,६८३ लोकांचे बळी गेले असून, २३,८०५ जखमी झाले. विशेष म्हणजे, अपघातात पहिल्या तीनमध्ये अनुक्रमानुसार मुंबई शहर, पुणे ग्रामीण व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे.वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मण यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. आठ महिन्यात सर्वाधिक २,३०५ अपघात एकट्या मुंबई शहरामध्ये झाले. दुसºया क्रमांकावर पुणे (ग्रामीण) असून १७६८ अपघात, तिसºया क्रमांकावरील नागपूर जिल्ह्यात १५७१ अपघात तर चौथ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ११९४ अपघात झाले आहेत. मात्र रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पुणे ग्रामीण पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ७८७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या क्रमांकावरील नाशिक ग्रामीणमध्ये ६३२ मृत्यू, तिसऱ्या क्रमांकावरील अहमदनगरमध्ये ६१७ मृत्यूमुखी पडले. नागपूर जिल्ह्यात बळींची संख्या ४२७ वर पोहचली आहे.
आठ टक्क्यांनी वाढली बळींची संख्यापरिवहन विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०१७ व जानेवारी ते सप्टेंबर २०१८ तुलनात्मक अपघातांचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या या महिन्यांमध्ये राज्यातील अपघातांच्या संख्येत किंचित घट झाली असली तरी, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. २०१७ मधील या आठ महिन्यांत २६,६४१ अपघात, ९,००१ मृत्यू तर २३,७३७ जखमी झाले आहेत तर २०१८ मधील आठ महिन्यात २६,६०५ अपघात, ९,६८३ मृत्यू तर २३,८०५ जखमींची नोंद झाली आहे. साधारण वजा ०.१ अपघात कमी झाले आहेत. मात्र मृत्यूमध्ये ८ टक्क्यांनी तर जखमींमध्ये ०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.