लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) द्वारे चांद्रयान-२ ही मोहीम राबविली होती. ती शेवटच्या टप्प्यात अयशस्वी ठरली असली तरी नागरिक व विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यात मोठे यश प्राप्त केले. याची प्रेरणादायी स्टोरी उपराजधानीतून आली आहे. येथे अवघ्या नऊ वर्षाच्या सिया नराळे या चिमुकलीने चांद्रयान-२ मोहिमेची प्रेरणा घेत रॉकेट लॉन्चिंगचे तंत्र शिकविणारे ‘रॉकेट सिमुलेशन अॅप’ विकसित केले आहे.टीपटॉप कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी असलेल्या सियाने विकसित केलेले हे अॅप मुलांसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. चांद्रयान-२ मोहिमेचे दूरदर्शनवरून प्रक्षेपण झाले. इस्रोच्या शास्त्रज्ञांची टीम, त्यातील महिला शास्त्रज्ञांनी बजावलेली कामगिरी या सगळ्या गोष्टी सियासाठी भारावणाऱ्या ठरल्या. याबाबत इंटरनेटवरून अभ्यास करीत स्वत:च रॉकेट सिमुलेशन अॅप विकसित केले. या अॅपद्वारे स्पेस स्टेशनवरून रॉकेटचे लॉन्चिंग कसे होते, अंतराळात लँडर, रोव्हरचे भ्रमण आणि चंद्रावर किंवा इतर ग्रहावर लँड कसे होते हे सर्व मुलांना क्रमाक्रमाने समजाविण्यात येते. हा एक प्रकारचा खेळ आहे, ज्यामध्ये मुले स्वत: सहभागी होऊन रॉकेट उडविण्याचे प्रात्यक्षिक करू शकतील. यात मनोरंजक गोष्ट म्हणजे सियाने कोडिंग तंत्राचा उपयोगही यात केला आहे. त्यासाठी ती व्हाईट हॅट ज्युनियर लर्निंग प्रोग्राममधून कोडिंगचे तंत्र शिकली व अॅपमध्ये त्याचा उपयोग केला. या अॅपमध्ये मुले एखाद्या मोबाईल गेमप्रमाणे रॉकेटच्या प्रत्येक सुट्या भागाचा अभ्यास करू शकतील आणि क्रमाक्रमाने हे सर्व पार्ट्स जोडून रॉकेट तयार करू शकतील. सियाच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. इस्रोची चांद्रयान मोहीम असफल ठरली तरी देशातील कोट्यवधी मुलांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत लाख मोलाची प्रेरणा निर्माण केली, हेच यातून सिद्ध होते.
नऊ वर्षाच्या सियाने बनविले रॉकेट शिकविणारे अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:32 PM
अवघ्या नऊ वर्षाच्या सिया नराळे या चिमुकलीने चांद्रयान-२ मोहिमेची प्रेरणा घेत रॉकेट लॉन्चिंगचे तंत्र शिकविणारे ‘रॉकेट सिमुलेशन अॅप’ विकसित केले आहे.
ठळक मुद्देइस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतून घेतली प्रेरणा