लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ अशी अपेक्षा बाळगाऱ्या एका आजारी वृद्धाचा बँकेच्या रांगेतच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील बँक आॅफ इंडियाच्या बडेगाव शाखेत घडली.भाऊराव गुलाबराव कांबळे (६०) रा.सिरोंजी (ता.सावनेर) असे या मृत वृद्धाचे नाव आहे. मात्र याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भाऊराव कांबळे गत काही दिवसांपासून आजारी होते. संजय गांधी निराधार योजनेची मासिक आर्थिक मदत बँकेत जमा झाल्याचे त्यांना कळले. त्यामुळे रुग्णालयातील उपचारासाठी हे पैसे उपयोगी पडतील या आशेने कांबळे आजारी अवस्थेतच गुरुवारी सकाळी ११ वाजता बँकेत पोहोचले. या योजनेतून रक्कम काढणाºया निराधार खातेधारकांची संख्या जास्त असल्याने गुरुवारी बँकेत गर्दी होती. त्यामुळे दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांचा टोकन क्रमांक आला. मात्र निराधर योजनेची रक्कम स्वीकारण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आजारी अवस्थेत बँकेच्या रांगेत सलग चार तास उभे राहिल्याने कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.बँक आॅफ इंडियाच्या बडेगाव शाखेतून खुबाळा,बावनगाव, उमरी, बुरडोह, खर्डुका, रिसाळा, खुबाळा, हिंगणा, कोच्छी, रायवाडी, सुर्यवाणी, महारकुंड सोनपूर, सिंदेपानी, टेकाडी या गावातील अनेक निराधर वृद्धांचे संजय गांधी निराधार योजनेतील बँक खाते. परिसरातील याच बँकेत ही व्यवस्था असल्याने या बँकेत महिनाभर या योजनेचे पैसे काढण्यासाठी वृद्धांची गर्दी असते. नेहमीप्रमाणे गुरुवारीही गर्दी होती. मात्र बँकेत वृद्धांना उभे राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने कांबळे यांना पैशांसाठी चार तास ताटकळत राहावे लागले, यातच त्यांचा मृत्यू झाला.कधी सुधारणार ?नोटांबदीनंतर देशातील बॅकांच्या रांगेत अनेकांचा मृत्यू झाला. यानंतर राष्ट्रीयकृत बँकाच्या कामकाजात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही ग्रामीण भागातील बँकाची स्थिती आहे तशीच आहे. बहुतांश बॅँकामध्ये आजही खातेधारकांना उभे राहण्यासाठी शेड नाही. बडेगाव येथील बँक आॅफ इंडियामध्ये निराधार योजनेचे मोठ्या प्रमाणात खातेदार असतानाही तिथे ही सुविधा का नाही ? याबाबत संबंधित बँक व्यवस्थापकांनी त्यांच्या वरिष्ठाकडे ही बाब लक्षात आणून दिली का ? याबाबत स्थानिक नागरिकांकडून विचारणा होत आहे.
निराधार वृद्धाचा बॅँकेच्या रांगेतच गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 9:44 PM
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ अशी अपेक्षा बाळगाऱ्या एका आजारी वृद्धाचा बँकेच्या रांगेतच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील बँक आॅफ इंडियाच्या बडेगाव शाखेत घडली.
ठळक मुद्देचार तासानंतर आला नंबर : पोलिसात नोंद का नाही ?