नागपूर :नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) व एनएमआरडी हे आमच्या रडारवर आहेत. नासुप्रतर्फे आकारण्यात येणारे प्रती चौरस फूट ५६ रुपये विकास शुल्क अवास्तव आहे. येथे नागरिकांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेऊ, आमच्या मंत्र्यांपर्यंत येथील समस्या पोहचवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रशात पवार यांनी दिला.
पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट येत्या काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनता दरबार घेतले जातील. यात येणारे प्रश्न संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहचविले जातील. त्याचा पाठपुरावा केला जाईल. जर त्यानंतरही काम झाले नाही तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी १५ दिवसांनी संबंधित कार्यालयात जावून जाब विचारतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते.
लवकरच कार्यकारिणीची घोषणा
- नागपूर व जिल्ह्याची कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल. शनिवारी पूर्व व दक्षिण विधानसभा मतदारसंघांचे विभागीय अध्यक्ष नेमण्यात आले. उर्वरित विभागीय अध्यक्षांची निवड १५ दिवसात केली जाईल. सोबत प्रत्येक तालुक्यात व विभाग स्तरावर संपर्क अभियान राबविले जाईल,असेही पवार यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या तक्रारी जाणून घेणार
- महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या माजी नगरसेविका आभा पांडे या प्रत्येक शुक्रवारी दुपारी १ ते २.३० या वेळेत काचिपुरा येथील पक्ष कार्यालयात महिलांच्या समस्या व प्रश्न ऐकूण घेतील. ते प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मेट्रोच्या अहवालावर काँग्रेस गप्प का ?
- महामेट्रोच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसचे आ. विकास ठाकरे वगळता काँग्रेसचा एकही नेता याविरोधात बोलायला तयार नाही. या अहवालावर काँग्रेसचे नेते गप्प का आहेत, असा सवाल पवार यांनी केला.