नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या पथकाने सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलडोजरच्या साहाय्याने सीताबर्डी मेन रोड व अभ्यंकर रोड लगतची ३५ दुकाने जमीनदोस्त केली. सकाळी वर्दळ असलेल्या या परिसरात सायंकाळी ४.३० च्या सुमारास सर्वत्र मलबा पसरला होता.
नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा-सीताबर्डी येथील खसरा क्र. ३२० व ३१५ या जागेवर नासुप्र व बुटी कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने में गोयल गंगा समूहाला ग्लोकल मॉल उभारण्याला अंशत: आक्युपेंशी प्रमणापत्र जारी केले होते. नासुप्रने या इमारतीच्या नकाशाला मंजुरी देताना प्रस्तावित मॉलचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत समोरील जागेत दुकानांना अस्थायी मंजुरी दिली होती. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर संबंधित दुकानदारांनी दुकाने खाली करणे अपेक्षित होते. मात्र दुकाने खाली न केल्याने नासुप्रने २९ एप्रिल २०२२ रोजी संबंधित ३५ दुकानदारांना नोटीस बजावली होती. याविरोधात दुकानदार गोविंदलाल मोहता, गौरांग काटोरिया, आर. विनोद, मे. सम्राट गॉरमेंट्स, अक्षय योगेश पांडे आदींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रविवारी १ मे रोजी यावर न्यायालयात सुनावणी झाली. मात्र दुकानदारांना दिलासा मिळाला नाही.
सोमवारी नासुप्र पथकाने पोलीस बंदोबस्तात दुकाने हटविली. ही कारवाई नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता प्रशांत भंडारकर, विभागीय अधिकारी (पश्चिम) अविनाश बडगे, कार्यकारी अभियंता विनायक झाडे, सहायक अभियंता विवेक डफरे, पथकप्रमुख मनोहर पाटील आदींनी केली.
संपूर्ण तयारीनंतरच कारवाई
दुकानांचे बांधकाम हटविण्यासाठी नासुप्रने पोलीस बंदोबस्त मागितला होता. त्यानंतर सीताबर्डी, धंतोली व अंबाझरी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ५६ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नासुप्रने ही कारवाई करण्यासाठी ३ पोकलेन, ४ जेसीबी व १२ टिप्पर यांसह ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर लावले होते. सुरुवातीला काही दुकानदारांनी कारवाईला विरोध दर्शविला. मात्र मोठा पोलीस बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीत पार पडली.